मृदुल स्वर लोपला, सुमन कल्याणपूर यांचे निधन
‘मृदुल करांनी छेडित तारा’ असे म्हणत तब्बल सहा दशके रसिक हृदयाच्या तारा छेडणारा मृदुल स्वर आज हरपला. प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘निंबोणीच्या झाडामागे’मधील आत्मीयता, ‘अरे संसार संसार’ मधील अगतिकता, ‘जिथे सागरा’मधील व्याकुळता, ‘शब्द शब्द जपुनी ठेव’मधील आर्जव, ‘केशवा माधवा’तील आर्तता आणि ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’मधील रोमँटिसिझमचा स्वरसाज ल्यायलेल्या एका समृद्ध मैफलीने भैरवी घेतली. आपल्या मखमली आवाजाने रसिकांना अपार आनंद देणाऱया सुमनताईंच्या निधनाने एका युगाचा अस्त झाला आहे.
सुमन कल्याणपूर मुंबईत अंधेरी येथे वास्तव्यास होत्या. प्रसिद्धीपासून कायम दूर राहणाऱया सुमनताई गेल्या अनेक वर्षांपासून संगीतसृष्टीपासून दूर होत्या. त्यांनी गाणेही थांबवले होते. मागील काही काळापासून वयपरत्वे त्या थकल्याही होत्या. त्यातच आज रात्री 8 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी चारूल, जावई डॉ. मनोज अग्नी, नातू अवनीश आणि नात ऐशानी असा परिवार आहे. सुमनताईंवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अखंड हिंदुस्थानातील (आताचा बांगलादेश) भवानीपूर येथे झाला होता. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या सुमनताईंनी आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीचे शिक्षण घेतले. त्यांचे माहेरचे आडनाव ‘हेमाडी’ असे होते. लग्नाआधी त्यांनी ‘सुमन हेमाडी’ याच नावाने गाणी गायली. रामचंद्र कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या सुमन कल्याणपूर झाल्या. पं. केशवराव भोळे, अब्दुल रहमान खान आणि गुरुजी मास्टर नवरंग यांच्याकडूनही त्यांनी संगीत शिक्षण घेतले होते.
अजरामर गाणी
- केतकीच्या बनी तिथे नाचला मोर
- रिमझिम झरती श्रावणधारा
- सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
- ओमकार प्रधान रूप गणेशाचे
- वाट इथे स्वप्नातील संपली जणू
- नाविका रे वारा वाहे रे
- आजकाल तुझ्या आणि माझ्या प्रेमाच्या चर्चा…
- निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई…
- हे जग जग
- शब्द शब्द जपून ठेव
- केशवा माधवा…
- जिथे सागरा धरणी मिळते
- सुंदर बाई, मला तुझ्यावर प्रेम करायचं नव्हतं.
- नाही नाही प्रेम नाही
लोकप्रियतेच्या शिखरावर असताना गाणे सोडले
लोकप्रियतेच्या या शिखरावरच असताना त्यांनी एकदम गाणे गायचे सोडून दिले. काही अंतर्गत वादामुळे रफी यांनी लतादीदींबरोबर गायचे सोडून दिल्याने लतादीदींची काही गाणी सुमनताईंच्या वाटेला आली आणि त्यांनी त्या गाण्याचे अक्षरशः सोने केले. लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर या हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या ‘चांद’ या हिंदी चित्रपटाकरिता एकत्र गायल्या होत्या. सुमन कल्याणपूर यांनी तब्बल 740 चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. ‘छोडो, छोडो मोरी बायन’, ‘दिल गम से जल रहा’, ‘यूं ही दिल ने चाहता था’, ‘बुझा दिये हैं’, ‘मेरे संग गा’, ‘तुम अगर आ सक तो’, ‘जिंदगी डुब गई दर्द के तुफानो में’, ‘जिंदगी इम्तेहान लेती है’, ‘शराबी, शराबी ये सावन का मौसम’ अशी अनेक हिंदी गाणी गायली. हिंदी चित्रपट ‘रेशम की डोरी’मधील ‘बेहेना ने भाई की कलाई में’ या गाण्यासाठी त्यांना 1975 मध्ये ‘फिल्मफेअर’ सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
- मराठी भावगीतामध्ये त्रिवेणी नांदली. लता, आशा आणि सुमन. सात्त्विक शैलीची, आपली संस्कृतीचे दर्शन घडवणारी, सगळय़ा भावभावनांनी मोह घालणारी अशी जी भावगीताची महाराष्ट्राची जी संपत्ती आहे ती संपत्ती या त्रिवेणीने खूप वाढवली. त्यात सुमनताईंचे योगदानदेखील खूप मोठे आहे. त्यांच्या जाण्याने भावसंगीताचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
- सुमनताई प्रसिद्धीपासून कायम दूर राहिल्या. काम करून बाजूला व्हायचे. उगाच कशातही मत व्यक्त करायला जाऊ नये असे त्यांचे पहिल्यापासूनचे मत होते. त्यांच्या जीवनप्रवासावर मी ‘सुमन सुगंध’ नावाचे चरित्र लिहिले. चरित्रलेखिका या नात्याने मी एवढेच सांगेन की, त्या सुखाने, समाधानाने आणि सात्त्विकतेने भरभरून आयुष्य जगल्या.
Comments are closed.