हापूस हंगाम संपला आता कर्नाटक, गावरान आंब्यावर भिस्त

फळांचा राजा असलेल्या रत्नागिरी हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. पुढील पाच ते सहा दिवसच कोकणच्या हापूसची चव पुणेकरांना चाखता येणार आहे. यंदा अवकाळी आणि उन्हामुळे गावरान आंब्याची आवक कमी आहे. त्यामुळे पुढील महिनाभर कर्नाटक आणि गावरान आंब्यावर खवय्यांना समाधान मानावे लागणार आहे.

कोकणातील देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आदी भागातून आंबा दाखल होत होता. आता रविवारी पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात शेवटची सुमारे तीनशे ते चारशे पेट्यांची आवक झाली. आता हा पिकणारा आंबा बाजारात उपलब्ध असणार आहे. यंदा उशीरा आंब्याचा हंगाम सुरू झाला. उष्णता आणि बदललेल्या वातावरणामुळे आवक वाढणार की नाही अशी शंका होती. मात्र, दुसर्‍या मोहरातील आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे सुरूवातीला दोन अडीच हजार डझन असलेला महाग हापूस आंबा शेवटी अगदी अडीचशे ते पाचशे रूपयापर्यंत खाली आहे. आता कोकण हापूसचा हंगाम संपला असून गावरान आंबे आणि कर्नाटक आंबे उपलब्ध आहेत, अशी माहिती बाजार समितीचे फळे व भाजीपाला विभागाचे प्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी दिली.

मार्केटयार्डातील हापूसचे भाव

रत्नागिरी हापूस तयार
४ ते ७ डझन १२०० ते २५०० रुपये
१ डझन तयार २०० ते ५०० रूपये

कर्नाटक आंब्याचे भाव (कच्चा)

कर्नाटक आंबा ३ ते ५ डझन १२०० ते १६०० रूपये
पायरी ४ डझन १००० ते १४०० रूपये
लालबाग २५ ते ३० रूपये किलो
बदाम ३० ते ४० रूपये किलो

कोकणातील आंब्याची आवक थांबली असून हंगाम संपला आहे. बाजारात तयार आंबा उपलब्ध आहे तेवढाच आंबा आहे. आता पुढील वर्षी कोकणच्या आंब्याची चव चाखचा येणार आहे. – अरविंद मोरे, हापूस आंब्याचे व्यापारी, मार्केटयार्ड.

बाजारात मुळशी, खडकवासला मांडवी, भोर, वेल्हा आदी भागातून गावरान आंब्याची आवक होत आहे. रविवारी सुमारे २० ते २२ क्रेट आवक झाली. यंदा अवकाळी अवकाळी पावसाने मोहोर गेला. तर, कडक उन्हामुळे कैरी गळून गेली. त्यामुळे आंबा कमी आहे. बाजारात गावरान हापूस एक डझन ३०० रूपये, पायरी २०० ते २२५ रूपये डझन, रायवळ ५० ते १०० रूपये डझन, केशर ५० ते ७० रूपये किलो असे दर मिळत आहेत. – तात्या कोंडे, गावरान आंब्याचे आडतदार, मार्केटयार्ड.

कर्नाटक आंबा हंगाम अजून १० ते १५ दिवस चालेल. कर्नाटकातून दररोज साधारण १० ते १२ हजार पेटी आवक होत आहे. यंदा आंब्याचा दर्जा चांगला असून ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. – रोहन उरसळ, कर्नाटक आंब्याचे आडतदार, मार्केटयार्ड.

Comments are closed.