21 दिवसांत 860 गावठी दारूअड्डय़ांवर कारवाई, पांगरमलसारख्या दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती कायम

जिल्हाभर गावठी दारूचे अड्डे राजरोसपणे सुरू असल्याचे पोलिसांनी गेल्या 21 दिवसांत केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पुणे येथे विषारी दारूमुळे 18 जणांना जीव गमवावा लागला. यानिमित्ताने दहा वर्षांपूर्वी जिह्यातील पांगरमल येथे घडलेल्या घटनेची चर्चा रंगली. या घटनेनंतरही जिह्यातील गावठी दारूअड्डे बंद झालेले नाहीत. उलट पोलिसांच्या साक्षीने राजरोसपणे हे दारूअड्डे सुरू असल्याचे चित्र आहे. पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलीस पथकांनी 21 दिवसांत 860 गावठी दारूअड्डे नष्ट केले आहेत.

अहिल्यानगर जिह्यात देशी आणि विदेशी दारूप्रमाणेच गावठी दारूदेखील मोठय़ा प्रमाणात विकली जाते. विशेष म्हणजे पोलिसांना माहिती असतानाही या दारूअड्डय़ांवर कारवाई होत नाही. त्यामुळे हे दारूविक्रेते नागरिकांच्या आरोग्याशी खेळतात. कोणताही परवाना नसताना प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे अड्डे सुरू आहेत. दहा वर्षांपूर्वी पांगरमल येथे अशीच विषारी दारू प्यायल्याने नऊजणांचा मृत्यू झाला होता, तर दोघांना अंधत्व आले होते. जिह्यातील सध्याची दारूअड्डय़ांची संख्या पाहाता, या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. हातभट्टय़ांतून शहरे सुटलेली नाहीत. विशेष म्हणजे जिह्यात अधिकृत दीड हजारांहून अधिक परमीट बार आणि वाईन शॉप आहेत; परंतु स्वस्त नशेच्या शोधात जाणारे या गावठी दारूअड्डय़ांवर गर्दी करतात.

राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक पोलीसही या अड्डय़ांकडे काणाडोळा करतात. परिणामी या अड्डय़ांवर दररोज जीवाशी खेळणारी लाखो लिटर दारू विकली जात आहे. जिह्यात एक हजाराहून गावठी दारूचे अड्डे कार्यरत असल्याचे पोलिसांनी मागील 21 दिवसांत केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी कठोर कारवाईचे आदेश दिल्याने 21 दिवसांत 860 गावठी दारूअड्डे नष्ट करण्यात आले आहेत. एक हजारांहून अधिक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता हे अड्डे पुन्हा सुरू होणार नाहीत, यासाठी पोलीस प्रशासनाला दक्ष राहावे लागणार आहे. नाहीतर पुणे व पांगरमलची पुनरावृत्ती होण्यास उशीर लागणार नाही, अशी मागणी होत आहे.

अहिल्यानगर जिह्यातील अवैध धंदे तसेच गावठी दारूअड्डय़ांवर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने 130 ठिकाणी छापे घालून मोठय़ा प्रमाणात अशी दारू नष्ट केली आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे.

– किरण कुमार कबड्डी, पोलीस निरीक्षक.

बनावट दारूअड्डय़ांवर कारवाई होणे गरजेचे आहे; परंतु तसे न होता जे अधिकृतपणे परवाना घेऊन परमीट बार चालवतात, त्यांनाच त्रास दिला जातो. जे परवाना घेऊन व्यवसाय करतात, त्यांना नाहक त्रास देऊ नये.

– हेमंत जाधव, अध्यक्ष, जिल्हा परमीट बार व हॉटेल असोसिएशन

Comments are closed.