हिंदू असल्याचा अभिमान आहे, पण मी अंधभक्त नाही… शशांक केतकर स्पष्टच बोलला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आला आहे. देव, धर्म आणि श्रद्धा यांसारख्या संवेदनशील विषयांवर बोलताना शशांकने कोणतीही आडपडदा न ठेवता आपली भूमिका मांडली. स्वतःला अभिमानी हिंदू म्हणवून घेणाऱ्या शशांकने अंधभक्तीपासून मात्र स्पष्ट अंतर राखत असल्याचे सांगितले.

राजश्री मराठीला मुलाखत देताना शशांक म्हणाला की, आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींसाठी सर्वप्रथम माणसाने स्वतःकडे पाहिले पाहिजे. यश मिळाले तर त्याचे श्रेय आपण घेतो, पण अपयश आले की देवाला जबाबदार धरण्याची सवय चुकीची आहे. आपल्या निर्णयांमुळे, कृतींमुळे आणि चुका झाल्यामुळे अनेक संकटे येतात. त्यामुळे त्या चुकांचे खापर देव किंवा कोणत्याही गुरूवर फोडणे त्याला मान्य नसल्याचे त्याने स्पष्ट केले.

श्रद्धेबाबत बोलताना शशांकने सांगितले की, देवावर त्याचा विश्वास आहे. कठीण प्रसंगी मनाला आधार मिळावा म्हणून देवासमोर हात जोडणे त्याला योग्य वाटते. मात्र श्रद्धा आणि अंधभक्ती यात मोठा फरक असल्याचे तो ठामपणे सांगतो. “मी अभिमानी हिंदू आहे, पण कुणाचाही अंधभक्त नाही,” असे तो म्हणाला.

रोजच्या जीवनातही तो देवाचे स्मरण करतो. घराबाहेर पडताना देवाला नमस्कार करून कुटुंब सुखरूप राहावे, प्रवास निर्विघ्न व्हावा आणि आपल्या हातून कोणाचेही नुकसान होऊ नये, एवढीच प्रार्थना करत असल्याचे त्याने सांगितले. “देवावर आधीच जगाचा खूप भार आहे, त्यात माझ्या अपेक्षांचे ओझे वाढवायचे नाही,” असे म्हणत त्याने आपली भूमिका हलक्याफुलक्या शब्दांत मांडली.

Comments are closed.