मुंबईत झालं स्वतः चं घर! स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णींच्या नव्या घराची सोशल मीडियावर चर्चा
मुंबईत घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं.. मुंबईत घर झालं म्हणजे आपण एक स्वप्न पूर्ण केलं असं म्हटलं जातं. गायक आशुतोष कुलकर्णी आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांचंही मुंबईत घर घेण्याचं स्वप्न अखेर पूर्णत्वास आलेले आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आणि प्रतीक्षेनंतर या दाम्पत्याने मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून ही आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नव्या घरातील काही खास क्षण सोशल मीडियावर पोस्ट करत आशिष कुलकर्णीने मनातील भावना व्यक्त केल्या. मुंबईत स्वतःचं घर कधी घ्यायचं हाच गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रत्येक चर्चेचा विषय होता.
आशिषने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, हे स्वप्न कधी पूर्ण होईल याची खात्री नव्हती, पण त्यावरील विश्वास मात्र कायम होता. अखेर त्या स्वप्नाला आता कायमचा पत्ता मिळाला असून मुंबईने दिलेल्या या संधीबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे. शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये स्वानंदी गुलाबी साडीत तर आशिष पारंपरिक कुर्त्यात दिसत आहे. नव्या घराच्या बाल्कनीत दोघांनी केलेलं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. त्यांच्या या यशाबद्दल अनेक कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
डिसेंबर 2023 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या स्वानंदी आणि आशिषची जोडी मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. अभिनय आणि संगीत क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या या दोघांच्या नव्या घरामुळे त्यांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या अध्यायाची सुरुवात झाली आहे.
Comments are closed.