शाश्वतच्या शतकाच्या जोरावर ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा विजय
शाश्वत जगतापच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर ईगल ठाणे स्ट्रायकर्सने दणदणीत विजय मिळवला. सोमवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी 20 मुंबई लीगच्या सलामीच्या सामन्यात बांद्रा ब्लास्टर्सवर नऊ विकेट्स राखून विजय मिळविला.
ब्लास्टर्सच्या 190 धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना स्ट्रायकर्सने शाश्वत आणि इम्पॅक्ट प्लेअर सुमेर झवेरी यांच्या धडाकेबाज सलामीच्या भागीदारीने हा सामना जिंकला. या जोडीने सलामीच्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी केली. सुमेरने अवघ्या 36 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि चार षटकारांसह शानदार 80 धावांची खेळी साकारली. मात्र, शाश्वत शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने अवघ्या 50 चेंडूंमध्ये एक शानदार शतक पूर्ण करून ईगल ठाणे स्ट्रायकर्सला सहज विजय मिळवून दिला,
तत्पूर्वी, बांद्रा ब्लास्टर्सने डळमळीत सुरुवातीनंतर चांगली कामगिरी करत 189/9 धावा केल्या. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ईगल ठाणे स्ट्रायकर्सने सुरुवातीलाच यश मिळवले, कर्णधार शार्दुल ठाकूरने प्रतीककुमार रविशंकरला शून्यावर बाद केले. सुवेद पारकर (30) आणि पराग खानापूरकर (16) यांनी 45 धावांची भागीदारी करून डाव सावरला, पण अथर्व अंकोलेकरने सलग दोन चेंडूंवर दोन बळी घेतले. त्यानंतर ध्रुमिल मटकरने 17 चेंडूंमध्ये नाबाद 28 धावा केल्या आणि ब्लास्टर्सला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यास मदत केली.
संक्षिप्त धावसंख्या ः बांद्रा ब्लास्टर्स 20 षटकांत 9 बाद 189 (जय जैन 45, ओम केशकामत 40, सुवेद पारकर 30; ओंकार तरमळे 3/28, अथर्व अंकोलेकर 2/34) पराभूत विरुद्ध ईगल ठाणे स्ट्रायकर्स 15.2 षटकांत 1 बाद 194 ( शाश्वत जगताप नाबाद 100, सुमेर झवेरी 80).
Comments are closed.