तू नव्या युगाची आशा…
>> प्रसाद लाड
20 वर्षांपूर्वीची गोष्ट आठवते का पाहा… क्रिकेटची मॅच असली की रस्त्यांवर भीषण शांतता असायची. सचिन तेंडुलकर फलंदाजी करत असला तर घरातल्या व्यक्ती आपली जागा सोडत नव्हते. सचिन शतकाच्या समीप आला की सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असायच्या. मुंग्यासारखी माणसं टीव्हीला चिकटलेली असायची. सचिनचे शतक राष्ट्रीय सणासारखे साजरे केले जायचे. जसे बाकीचे फलंदाज चौकार-षटकार मारायचे तसाच सचिनही धावा जमवायचा, पण त्याच्या खेळात देदीप्यमान नजाकत होती. स्वर्गीय सुखाचा आनंद देणारी त्याची खेळी असायची. सर्वच जण या आठवणींत काही दिवसांपर्यंत रुंजी घालत होते. पुन्हा तो काळ येणे नाही असंही म्हटलं जायचं, पण अखेर आता तो काळ आला आहे याची चाहूल लागत आहे. 20 वर्षांपूर्वी त्याचा जन्मही झाला नव्हता. आता मिसरुडही फुटलेली नसताना तमाम क्रिकेट विश्वाला आपली दखल घ्यायला लावली आहे ती वैभव सूर्यवंशीने. यंदाची आयपीएल एकहाती गाजवत सर्व गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला तर त्याने भाग पाडलेच अन् सर्वांची मनंही जिंकली. ऑरेंज कॅपचाच तो मानकरी ठरला नाही, तर आयपीएमधले चार मानाचे पुरस्कारही त्याने आपल्या नावावर केले. त्यामुळे ही फक्त नांदी ठरावी अशी आशा चाहते मनात बाळगून आहेत.
वैभवचं नाव जेव्हा पहिल्यांदा लिलावासाठी पुकारलं गेलं होतं तेव्हा हा पोरगा काय आंतरराष्ट्रीय गोलंदाजांपुढे उभा राहणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. असंच काहीसं सचिनबबातही म्हटलं गेलं होतं. पण सूर्य आणि गुणवत्ता सारखीच. ती कितीही झाकोळण्याचा प्रयत्न केला तरी ती सर्वांसमोर आल्यावाचून राहत नाही हेच वैभवबाबतही घडलं. गेल्या वर्षी त्याने आपली झलक दाखवली. ट्रेलर चांगला असला म्हणजे सिनेमा तेवढाच ताकदीचा असतो असं नाही, पण यावेळी जे घडलं ते पाहून चाहत्यांचे डोळे दिपून गेले. कारण आयपीएलची चर्चा एका बाजूला आणि वैभव दुसऱ्या असंच पाहायला मिळालं. जिथे-तिथे सगळीकडे वैभवची चर्चा होती. वैभव फलंदाजीला आला तर लोकं पाहण्यासाठी आवर्जून जमायला लागली. शतकासमीप आल्यावर चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. पुन्हा एकदा तीच जुनी गोष्ट पाहायला मिळाली, जणू एक वर्तुळ पूर्ण होत असल्यासारखं वाटायला लागलं. पण, पिक्चर अभी बाकी हैं… असं यावेळी म्हणायला लागेल.
वैभवच्या फलंदाजीबाबत सर्वच बोलून झाले आहेत. त्याबद्दल बोलणं-लिहिणं उचित नाही. पण वैभवच्या दोन गोष्टी आवर्जून पाहायला हव्यात. एक म्हणजे त्याचा बेदरकारपणा आणि विनम्रपणा. दोन्ही विरुद्ध टोकं. वैभवने या आयपीएमलध्ये दाखवून दिलं की, समोर बुमराह असो की हेझलवूड, स्टार्क असो किंवा रबाडा… त्याने प्रत्येकालाच मैदान दाखवलं. अगदी बुमराला पहिल्याच चेंडूवर तर त्याने आपले इरादे दाखवून दिले. पूर्वी फलंदाज गोलंदाजाचा चेहरा पाहूनच घाबरायचे, पण वैभव गोलंदाजाचा चेहरा नाही, तर चेंडू पाहतो हे सर्वांनाच दिसले. मैदानात आक्रमक असणारा वैभव खेळत नसताना मात्र विनम्र असल्याचे पाहायला मिळाले. मैदानात सराव करताना त्याला सुनील गावसकर दिसले तर तो त्यांच्याकडे धावून आला आणि त्यांच्या पाया पडला. एखादी मोठी व्यक्ती दिसल्यावर त्याचे पाय आपसूकच त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जातात. हे तुमचे संस्कार दाखवतात. कोणतीही व्यक्ती मोठी होण्यासाठी दोन गोष्टी लागतात, त्या म्हणजे गुणवत्ता आणि वृत्ती. या दोन्ही गोष्टी वैभवकडे आहेत आणि त्याच सचिनकडेही होत्या. सचिन आणि वैभवची तुलना होऊ शकत नाही. पण जी गोष्ट चाहते सचिनमध्ये पाहत होते, ती आता वैभवकडे पाहत आहेत हे सत्य मात्र स्वीकारायला हवं.
वैभव 15 वर्षांचा असला तरी त्याच्याकडे दूरदृष्टी आहे. वैभव हा ‘लंबी रेस का घोडा’ आहे हे त्याच्या बोलण्यावरूनच समजतं. आयपीएलची फायनल संपल्यावर रवी शास्त्रींनी त्याची मुलाखत घेतली, त्यावेळी वैभव सांगत होता की, ‘यंदाच्या आयपीएलमध्ये मी दडपण कसं हाताळायचं ते शिकलो, ज्याचा फायदा मला पुढच्या वर्षी होईल. यापूर्वी मी पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारायला जायचो, पण प्रत्येक वेळी त्याची गरज नसते. संघाला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट आपण करायला हवी. कारण परिस्थिती प्रत्येक वेळी सारखी नसते. त्यामुळे परिस्थिती ओळखून यानंतर मी फलंदाजी करेन.’ वैभवची ही भाषा ऐकून तो किती पुढचा विचार करतो आणि आपल्या चुका कशा सुधारतो हे पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत बरेच गुणवान खेळाडू आले. त्यामधले काही टिकले तर काही सर्वस्व गमावून घरी बसले. वैभवसाठी हे वय सर्वात महत्त्वाचे आहे. यश आणि पैसा त्याला फारच लवकर मिळाला आहे. आता यापुढे त्याची खरी कसोटी आहे. कारण एखादी गोष्ट साध्य करणं कठीण असतेच, पण त्यापेक्षा कठीण असते ती गोष्ट टिकवणं. त्यासाठी सातत्य लागतं. अपयशाला तुम्ही कसं तोंड देता हेदेखील महत्त्वाचं ठरतं. वैभवची गोष्ट जरा वेगळी वाटते. कारण आपल्या आईवडिलांचा संघर्ष त्याने पाहिला आहे. मुलासाठी शेती विकणाऱया बाबाचं काय काळीज असेल हे त्याने अनुभवलं आहे. मुलाच्या आहारात काही कमी नको म्हणून फक्त तीन तास झोपून मध्यरात्री 2 वाजता डबा बनवण्यासाठी उठणारी आई त्याने पाहिली आहे. त्यामुळे त्याने मिळवलेलं हे वैभव वाया जाऊ नये अशीच चाहत्यांची आशा असेल. वैभवच्या रूपात भारतीय क्रिकेटला एक नव्या युगाचा तारा मिळाला आहे. हा तारा अजिंक्य तारा बनतो का हे पाहणेच उत्सुकतेचे ठरणार आहे.
Comments are closed.