काय सांगता, भारत आपल्याच देशात पाहुणा म्हणून खेळणार? दिल्लीत तीन टी 20 सामन्यांचे आयोजन!
आपल्या क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आपल्याच देशात पाहुणा म्हणून खेळणार आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये दिल्लीत तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे, ज्यामध्ये भारत यजमान म्हणून नाही तर पाहुणा म्हणून खेळेल. या टी२० मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तान भुषवणार आहे. क्रिकेटच्या इतिहासातील हे एक अनोखे दृश्य असणार आहे.
अफगाणिस्तान प्रथमच भारतीय मायभूमीवर भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिकेचे आयोजन करणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सप्टेंबरमध्ये अरुण जेटली स्टेडियमवर भारताविरुद्ध तीन टी२० सामन्यांचे आयोजन करण्याची अफगाणिस्तानची योजना आखली जात आहे. या मालिकेची अधिकृत घोषणा झाली नसून हे सामने १३, १६ आणि १९ सप्टेंबर रोजी खेळवले जाणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. अफगाणिस्तान संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये एकमात्र कसोटी आणि तीन वनडे मालिकेचे नियोजन असून त्याचे वेळापत्रक निश्चित आहे.
अफगाणिस्तानचा भारत दौरा
६ ते १० जून – एकमात्र कसोटी, मुल्लणपूर
वनडे मालिका
१३ जून – पहिला वनडे सामना, धरमशाला
१७ जून – दुसरा वनडे सामना, लखनऊ
२० जून – तिसरा वनडे सामना, चेन्नई
या दौऱ्यावेळी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड सप्टेंबरमध्ये मालिका आयोजित करण्याबाबत बीसीसीआयशी चर्चा करू शकते. बीसीसीआयच्या एका सूत्राने माहिती दिली की, भारत आणि अफगाण क्रिकेट मंडळाचे संबंध चांगले आहेत.
तसेच भारतीय क्रिकेट बोर्डने आयर्लंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांना सामने खेळवून त्यांचा महसूल वाढवण्यासाठी मदत केली आहे. आता भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डांची विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यावर आगामी टी२० मालिकेची अधिकृत घोषणा करेल. अफगाणिस्तानने सप्टेंबरमध्ये ह्या टी२० मालिकांचे सामने अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्याचे आयोजित केले तर दिल्ली क्रिकेट असोसिएशनला दिल्ली टी२० लीगचे वेळापत्रकही त्यानुसार तयार करावे लागेल.
अफगाणिस्तानमधील राजकीय समस्यांमुळे गेल्या दशकात अफगाणिस्तान आपले घरचे सामने भारत आणि युएईमध्ये खेळत आहे. याआधी अफगाणिस्तानने २०१७ मध्ये ग्रेटर नोएडा येथे आयर्लंडविरुद्ध मालिका खेळवली होती, त्यानंतर २०१८ मध्ये देहराडून येथे बांगलादेशविरुद्ध टी२० मालिका खेळली. त्यानंतर त्यांनी काही काळासाठी मालिका युएईमध्ये आयोजित केल्या. तसेच त्यांनी २०२४ मध्ये नोएडामध्ये न्यूझीलंडविरुद्ध एक कसोटी सामना आयोजित केला होता, मात्र पावसामुळे मैदानाची स्थिती अत्यंत वाईट झाल्याने सामना रद्द करण्यात आला होता.
Comments are closed.