वाड्यातील डोंगस्तेत भूसुरुंगाचे स्फोट; घरांना तडे, नागरिकांचा जीव मुठीत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वाडा तालुक्यातील डोंगस्ते गावातील दगडखाणी ग्रामस्थांच्या मुळावर आल्या आहेत. दिवस-रात्र होणाऱ्या भूसुरुंग स्फोटांमुळे निसर्गाची हानी तर होतच आहे. शिवाय नागरिकांचा जीवही धोक्यात आला आहे. स्फोटांमुळे उडणारे दगड नागरिकांच्या घरावर धडाधड कोसळत असून छप्पर, भिंतींना तडे गेले आहेत. या दगड खाणींचा धोका एवढा वाढला आहे की इर्शालवाडीसारखी घटना येथे घडते की काय, अशी भीती ग्रामस्थांना सतावत आहे.

डोंगरावर दगडाचा शोध घेताना हजारो ब्रास मातीचे ढीग डोंगरावरच रचले जातात. पावसाळ्यात ही माती पाण्याच्या प्रवाहासोबत पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत येऊन शेतजमीन नापीक होते. या डोंगराच्या पायथ्याला शंभरहून अधिक आदिवासी लोकवस्ती आहे. खाणींमुळे डोंगर पोखरला जात असून एक दिवस हा डोंगरच खाली येऊन येथील संपूर्ण गावच गाडला जातो की काय ही भीती ग्रामस्थांना आहे. दगड खाणींमध्ये केले जाणारे भूसुरुंग स्फोट, डोंगरावरील दगड काढण्यासाठी बुलडोझर, जेसीबी या यंत्राच्या साहाय्याने होत असलेले खोदकाम, दगड फोडण्यासाठी केले जाणाऱ्या स्फोटांमुळे येथील डोंगराच्या भूभागाला हादरे बसत आहेत. या हादऱ्यांमुळे डोंगस्ते गावातील अनेक घरांना तडे गेलेले आहेत. येथील ग्रामस्थांनी शासन दरबारी याबाबत अनेकदा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र खदानमालकांच्या दडपशाहीमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील ग्रामस्थांचा आवाज दाबला गेला आहे.

Comments are closed.