ठाण्यात महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा 8 जूनपासून, गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षणाची संधी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सीबीएसई शाळा म्हटली की प्रशस्त वर्गखोल्या, आकर्षक व दर्जेदार सुविधा असे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. या शाळेमध्ये आपला मुलगा किंवा मुलगी शिकावी असे अनेकांना वाटते. पण महागड्या फीमुळे ते सर्वांना शक्य होत नाही. मात्र ठाणे महापालिकेने खारेगाव येथे सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ८ जूनपासून त्याचा श्री गणेशा होणार असून पहिल्या टप्प्यात नर्सरी ते दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. क्रिस्टल हाऊस इंडिया या संस्थेच्या वतीने हे वर्ग भरवले जाणार असून गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे.

ठाण्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील सीबीएसई अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळावे ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार खारेगाव येथे सफायर रुग्णालयाजवळ सीबीएसई शाळा उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सध्या शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी, खिडक्यांना ग्रील बसवणे, खेळाचे मैदान तयार करणे, अग्निशमन यंत्रणेची दुरुस्ती तसेच लिफ्ट दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या बैठकीत सांगितले.

बारावीपर्यंत मोफत शिक्षण

पुस्तके व शैक्षणिक साहित्याचा पुरवठा, विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था तसेच शाळेपर्यंत वाहतूक सुविधा मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करियर मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नर्सरीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणार आहे.

■ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी.
■ पालिका आणि क्रिस्टल हाऊस यांच्यात ३० सप्टेंबर २०२५ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार ३० वर्षांसाठी आहे.

Comments are closed.