करणीच्या संशयावरून हत्याकांड; शेजाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला, महिला ठार, पती चिंताजनक, आरोपीचाही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

करणीच्या संशयावरून शेजाऱ्याच्या दाम्पत्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना आज डहाणू तालुक्यातील सरावली परिसरातील पाटीलपाडा येथे घडली. त्यात महिला ठार झाली असून तिचा पतीही चिंताजनक आहे. गुलाब भरकूड असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या हल्ल्यानंतर आरोपीनेदेखील विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याच्यावर डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विलास नामकोडा हा आदिवासी समाजाचा असून तो शेती करतो. बऱ्याच वर्षांनंतर त्याचे लग्न झाले. पण एक महिन्याच्या आतच त्याची पत्नी आजारी पडली आणि तिचे निधन झाले. त्यामुळे निराश झालेला नामकोडा हा भगताकडे गेला. त्याने शेजाऱ्यांनी करणी केली असून सावध रहा असा सल्ला दिला. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या सुरेश भरकूड व त्यांची पत्नी गुलाब या दाम्पत्यावर विलास याचा रोष होता. त्यांनीच करणी केली या संशयातून त्याने बुधवारी दुपारी दोघांवरही कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यात सुरेश व त्यांची पत्नी गुलाब गंभीर जखमी झाले.

दोघांनाही डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी गुजरातच्या रुग्णालयात आणले. उपचारादरम्यान गुलाब भरकूड यांचा मृत्यू झाला तर सुरेश यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

या घटनेनंतर हल्लेखोर विलास नामकोडा यानेही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरही उपचार सुरू असून डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.