बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बारवर उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त
मुंबई बेकायदेशीर बार छापे : मुंबईतील बोरिवली भागात बेकायदेशीर आणि अवैध रित्या सुरू असलेल्या एका हायप्रोफाइल बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून त्यांचा मुजोरपणा मोडून काढला आहे. बोरिवली (पश्चिम) येथील एक्सर व्हिलेज परिसरातील ‘मुझा हॉटेल बाय एस. के. रीसॉर्ट’च्या 8 व्या मजल्यावरील ‘औरीस द स्काय लॉज’च्या गच्चीवर (रूफटॉप) राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही यशस्वी धाड टाकली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्र. 1 (मुंबई उपनगरे) यांनी 1 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही अत्यंत गोपनीय आणि मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान पथकाने लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला असून घटनास्थळावरून तिघांना अटक करण्यात आली आहे.
जवळपास दीड लाखांचा माल आणि 326 दारूच्या बाटल्या जप्त
या धडक कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्याचा आणि मालाचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे समोर आला आहे:
326 दारूच्या बाटल्या जप्त : कारवाई दरम्यान वेगवेगळ्या ब्रँड्सच्या एकूण 326 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये विदेशी स्कॉच व्हिस्की, परदेशी वाईन, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य (IMFL), बिअर आणि विझरच्या साठ्याचा समावेश आहे.
अंदाजे दीड लाखांचा मुद्देमाल : जप्त करण्यात आलेल्या या संपूर्ण अवैध मद्यसाठ्याची एकूण बाजारपेठ किंमत 1 लाख 58 हजार 875 रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.
तिघा मुजोर बार मालकांना बेड्या
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या बेकायदेशीर बारमधून कुणाल हितेंद्र विचारे (वय 32), स्वप्नील रवि पगार (वय 29) आणि विजय प्रकाश वंजारा (वय 30) या तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले हे बार मालक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांच्यावर आधी देखील विविध गुन्हे दाखल झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपींकडे या मोठ्या मद्यसाठ्याबाबत कोणताही वैध परवाना (License), पास किंवा अधिकृत खरेदीची कागदपत्रे आढळून आली नाहीत. हा मद्यसाठा विनापरवाना बेकायदेशीररीत्या केवळ ग्राहकांना विक्री करण्यासाठीच गच्चीवर ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
मनपाच्या कारवाईनंतरही बार सुरू
विशेष म्हणजे, मागच्या महिन्यात देखील या बारवर मुंबई महानगरपालिकेने (BMC) तोडक कारवाई केली होती. मात्र, तरीही मुजोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मालकांनी कायद्याची कोणतीही भीती न बाळगता हा बार पुन्हा बेधडकपणे सुरूच ठेवला होता. अखेर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत त्यांचा माज उतरवला आहे.
या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान पी. व्ही. गवळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत कलम 65 (ई), 81 आणि 83 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. जी. देवरे करत आहेत.
ही बातमी वाचा :
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Comments are closed.