बेंगळुरूमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक

चिथावणीखोर संदेश पाठवत असल्याच्या आरोपावरून कारवाई

. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

विदेशातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आणि देशातील सुरक्षेला धोका निर्माण केल्याच्या आरोपाखाली बेंगळूर पोलिसांनी संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या गोपनीय व अचूक माहितीच्या आधारे बेंगळूरच्या कॅतसंद्र येथे संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली.

अल्लाबक्ष (वय 24) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो तुमकूर शहरातील श्रीरामपूर येथील रहिवासी आहे. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे चिथावणीखोर संदेश पाठवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 20 दिवसांपूर्वी अल्लाबक्षची सोशल मीडियावर विदेशातील संशयित दहशतवाद्याशी ओळख झाली. संशयिताने एका सोशल मीडिया अकाऊंटवर केलेल्या पोस्टला अल्लाबक्षने प्रतिसाद देत अनेक संदेशही पाठवले. नंतर दोघांनी सोशल मीडियाद्वारे संपर्क सुरू ठेवत अनेक विषयांवर चर्चा केली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशाची अंतर्गत सुरक्षा आणि शांतता बिघडवण्यासाठी उभयतांमध्ये चिथावणीखोर संदेशांची देवाणघेवाण होत होती. केंद्रीय तपास यंत्रणा संशयित दहशतवादी अल्लाबक्षच्या सोशल मीडियावरील संशयास्पद हालचाली आणि राष्ट्रविरोधी चॅटिंगवर बारकाईने लक्ष ठेवून होत्या. त्याचे धागेदोरे शोधून काढल्यानंतर, तपास यंत्रणांनी कर्नाटक राज्य पोलिसांना माहिती पाठवली होती. त्यानुसार बेंगळूर शहर पोलिसांनी कॅतसंद्र येथे संशयिताला अटक केली.

सध्या अटकेत असलेल्या अल्लाबक्षला या कृत्यात मदत करणाऱ्या आणि त्याच्या  संपर्कात असलेल्या आणखी एका संशयिताबद्दल माहिती मिळाली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी बेंगळूर शहर पोलिसांनी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.

Comments are closed.