आता पुरे करा दादा! वैभव सूर्यवंशीचा पारा चढला, शेवटी हातच जोडले; श्रीलंकेत नेमकं काय घडलं?

इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा हंगाम खऱ्या अर्थाने गाजवला तो राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने. जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, मिचेल स्टार्क यासारख्या दिग्गज गोलंदाजांना त्याने आसमना दाखवले. तोडफोड फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधलेल्या वैभवची लोकप्रियताही प्रचंड वाढत आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या बळावर त्याची हिंदुस्थानच्या अ संघात त्याची वर्णी लागली. श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेत तो आपल्या बॅटची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी तो हिंदुस्थानच्या अ संघासोबत श्रीलंकेत दाखल झाला असून विमानतळावर त्याच्यासोबत घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

वैभव सूर्यवंशी याची क्रेझ फक्त हिंदुस्थानातच नाही तर शेजारील देश श्रीलंकेतही पाहायला मिळत आहे. हिंदुस्थानच्या अ संघ श्रीलंकेत दाखल होताच विमानतळावर वैभव सूर्यवंशी याला चाहत्यांनी अक्षरश: गराडा घातला आणि सेल्फीसाठी एकच गर्दी केली. सुरुवातीला वैभवने अत्यंत संयमाने चाहत्यांची ही मागणी पूर्ण केली. मात्र, एकामागून एक येणाऱ्या चाहत्यांचा हा सिलसिला थांबण्याचे नावच घेत नव्हता.

प्रदीर्घ प्रवासामुळे आधीच थकून गेलेल्या वैभवच्या चेहऱ्यावरही थकवा स्पष्ट जाणवत होता. शेवटी चाहत्यांचा उत्साह अनावर झाल्याचे पाहून आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच वैभवने दोन्ही हात जोडून चाहत्यांना पुढे न येण्याची आणि आपल्याला जाऊ देण्याची विनंती केली. वैभवचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

टीम इंडियाच्या टी-20 संघात एन्ट्री होणार?

सध्या जागतिक क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशी याचे नाव चर्चेत आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी तर बीसीसीआयला एक मोलाचा सल्ला दिला आहे. वैभवला लवकरात लवकर हिंदुस्थानच्या वरिष्ठ टी-20 संघात स्थान देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. आयसीसीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही मागणी केली. तसेच वैभवकडे अद्भूत टॅलेंट असल्याचेही ते म्हणाले.

आता शुभमनची ‘गंभीर’ कसोटी, अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव सामना आजपासून

तिरंगी मालिकेचे वेळापत्रक

9 जून 2026 हिंदुस्थान ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’
11 जून 2026 हिंदुस्थान ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’
13 जून 2026 अफगाणिस्तान ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’
15 जून 2026 हिंदुस्थान ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’
17 जून 2026 हिंदुस्थान ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’
19 जून 2026 अफगाणिस्तान ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’
21 जून 2026 अंतिम

Comments are closed.