सूर्यकुमार यादवसाठी 6 जून ठरला काळा दिवस! एका दिवसात सर्वकाही बदललं; आधी कर्णधारपद गेलं, मग श्र

सूर्यकुमार यादव बातम्या: भारतीय संघाला अवघ्या तीन महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषक 2026 जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी 6 जून हा दिवस अत्यंत निराशाजनक ठरला. सकाळी भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेण्यात आले आणि त्याजागी श्रेयस अय्यरची नियुक्ती करण्यात आली. हा मोठा धक्का पचवण्याआधीच संध्याकाळी मैदानावरही सूर्याला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, हा पराभवही त्याच श्रेयस अय्यरच्या संघाकडून झाला. टी-20 मुंबई लीगमध्ये सूर्यकुमार यादवच्या ट्रायंफ्स नाइट्स MNE आणि श्रेयस अय्यरच्या सोबो मुंबई फाल्कन्स यांच्यात सामना रंगला होता. दिवसभर चर्चेत असलेल्या या दोन्ही स्टार खेळाडूंनी मैदानावर आपल्या बॅटने उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

सूर्यकुमारची वादळी खेळी (Suryakumar Yadav T20 Mumbai)

गेल्या काही महिन्यांपासून सूर्यकुमार यादव धावांसाठी झगडताना दिसत होता. आयपीएलपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. त्याचाच फटका त्याला कर्णधारपद आणि संघातील स्थान गमावण्यात बसल्याची चर्चा सुरू होती. मात्र निवड समितीने निर्णय जाहीर केलेल्या दिवशीच सूर्याची बॅट अखेर तळपली. त्याने अवघ्या 24 चेंडूत 48 धावांची आक्रमक खेळी केली. चौकार-षटकारांची आतषबाजी करत त्याने संघाला वेगवान सुरुवात करून दिली. तरीही इतर फलंदाजांना मोठी साथ देता आली नाही आणि ट्रायंफ्स नाइट्सचा डाव 147 धावांवरच थांबला.

श्रेयसने अर्धशतक ठोकत हिसकावला विजय (Shreyas Iyer T20 Mumbai)

148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सोबो मुंबई फाल्कन्सची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. संघाचे दोन्ही सलामीवीर 41 धावांवर माघारी परतले. अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर मैदानात उतरला. अय्यरने संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख मेळ साधत डाव सावरला. त्याने सहकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचल्या आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. श्रेयसने 36 चेंडूत शानदार 61 धावांची खेळी करत अर्धशतक झळकावले. विजयासाठी फक्त 5 धावा बाकी असताना तो बाद झाला, पण तोपर्यंत सामना फाल्कन्सच्या खिशात गेला होता. अखेर सोबो मुंबई फाल्कन्सने 16.4 षटकांत 5 गडी राखून लक्ष्य गाठत दणदणीत विजय मिळवला.

सूर्याच्या जखमेवर मीठ चोळणारा दिवस

एकाच दिवशी आधी भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद गमावणे आणि त्यानंतर मैदानावरही श्रेयस अय्यरकडून पराभव स्वीकारावा लागणे, हा सूर्यकुमार यादवसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याने दमदार खेळी केली असली तरी संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. दुसरीकडे नव्या भारतीय टी-20 कर्णधाराने अर्धशतक झळकावत विजय मिळवून दिल्याने त्याचा दावा आणखी मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.

हे ही वाचा –

Rohit Sharma on Suryakumar Yadav : रोहित शर्माचा तो एक शब्द अन्… सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद जाताच हिटमॅनने जे म्हटलं, त्याने सगळ्यांचेच डोळे पाणावले

Comments are closed.