लेफ्टनंट गोस्वामी काश्मीरमध्ये शहीद झाले.

दहशतवादविरोधी कारवाईवेळी दरीत कोसळले : जंगलात 15 दिवसांपासून सुरू होती कारवाई

वृत्तसंस्था/ राजौरी

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिह्यात दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान लष्करी लेफ्टनंट बिरेश्वर गोस्वामी यांना हौतात्म्य प्राप्त झाले. लेफ्टनंट गोस्वामी हे ‘ऑपरेशन शेरुवाली’मध्ये सहभागी झाले होते. जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून ही मोहीम सुरू होती. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डोरिमल परिसरात शोधमोहिमेदरम्यान एक लेफ्टनंट घसरून 30 मीटर खोल दरीत कोसळले. गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

सुरक्षा दल गेल्या 15 दिवसांपासून राजौरी परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी दहशतवादविरोधी मोहीम राबवत आहे. जंगलमय भागात लपून बसल्याचा संशय असलेल्या दोन ते तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना शोधून पकडण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती.

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिह्यात दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान हुतात्मा झालेले लेफ्टनंट बिरेश्वर गोस्वामी यांच्या निधनाबद्दल भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने तीव्र शोक व्यक्त केला आहे. व्हाईट नाईट कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल पी. के. मिश्रा आणि इतर अधिकारी व जवानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. हुतात्मा लेफ्टनंट बिरेश्वर गोस्वामी यांचे बलिदान लष्करासाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील, असे लष्कराने म्हटले आहे.

 

Comments are closed.