अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
जालना : बीड आणि जालना (Jalna) जिल्ह्यातील एकाच दिवसात झालेल्या दोन लाचखोरीच्या प्रकरणाने महाराष्ट्रातील भ्रष्ट प्रशासकीय सेवेचा दाखलाच समोर आणला. या कारवाईनंतर सोशल मीडियातून स्वागत झालं, पण तहसीलदारसारख्या उच्च पदस्थ व्यक्तीकडून अशाप्रकारे लाच घेतल्यावरुन संतापही व्यक्त झाला आहे. आता, अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या गाजलेल्या लाच प्रकरणात चांगलाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे, याप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. अंबड लाच (Bribe) प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळुंके याला जालन्यातील गोंदी पोलिसांनी (Police) अटक केली आहे. सुयोग सोळुंके याच्यावर 2025 मध्ये अवैध वाळू चोरीचे दोन गुन्हे दाखल होते, याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण, 2025 मध्ये दाखल गुन्ह्यात त्याला आजपर्यंत अटक का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
आरोपी सुयोग सोळुंकेवर अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी आणि मारहाणीसह विविध गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच त्याच्यावर एक वर्षासाठी तडीपारीची कारवाईही देखील करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वीच त्याची या कारवाईतून जामीनावर सुटका करण्यात आली होती. दरम्यान, अवैध वाळू उत्खननासाठी वापरल्या जाणारे पोकलेन मशीन आणि सहा हायवा वाहने सुरू ठेवण्यासाठी सोळुंके याने तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजार रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तहसीलदार विजय चव्हाण यांना रंगेहाथ अटक केली होती. आता वाळू चोरीच्या गुन्ह्यात सुयोग सोळुंके याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, आरोपी सुयोग सोळुंकेवर यापूर्वी एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलीस ठाणे गोंदी गु र नं 217/2025, 218/2025, 230/2025 सर्व कलम 303(2),3(5) भा न्या सं सह कलम 3, 4 गौण खनिज (विकास व विनियमन) प्रतिबंध अधिनियमान्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणात, त्याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
एकाच दिवशी एसीबीच्या दोन धाडी
एसीबीने शनिवारी एकाच दिवशी दोन ठिकाणी धाड टाकत आधी पोलीस (Police) अंमलदारास 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केली. तर, दुसऱ्या धाडीत थेट तहसीलदारालाच बेड्या ठोकल्या. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना एका प्रकरणात 6 लाख 40 हजार रुपयांची लाच (bribe) स्वीकारताना बीड एसीबीने रंगेहात अटक केली. तत्पूर्वी, जालना एसीबीने बीडमधील नेकनूर येथे जाऊन पोलीस अंमलदारास लाच घेताना अटक केली. या दोन्ही कारवायांमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!
Comments are closed.