IND vs AFG: पहिल्याच कसोटी सामन्यात मानव सुथारची अनोखी कामगिरी! 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कारासह रचला इतिहास
मानव सुथारने (Manav Suthar) आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात इतकी भेदक गोलंदाजी केली की, अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्याच दिवशी पराभूत झाला. या सामन्यात भारताकडून दोन शतके झळकावण्यात आली आणि वॉशिंग्टन सुंदरनेही (Washington Sundar) उत्कृष्ट गोलंदाजी केली, तरीही मानव सुथारचे प्रदर्शन इतके जबरदस्त होते की त्याला पहिल्याच सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ हा किताब देण्यात आला. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात हा बहुमान मिळवणारा तो भारताचा नववा खेळाडू ठरला आहे.
भारतीय संघाने अफगाणिस्तानचा या कसोटी सामन्यात एका डावाने आणि 300 धावांनी पराभव केला. हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात मोठा विजय ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शुबमन गिल (Shubman gill and KL Rahul) आणि के.एल. राहुल यांनी शतकी खेळी केली. त्यानंतर मानव सुथारने अफगाणिस्तानच्या फलंदाजीला उध्वस्त केले.
मानवने अफगाणिस्तानच्या पहिल्या डावात 22 षटके गोलंदाजी करत 33 धावांत 6 विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये 10 षटके निर्धाव (मेडन) होती. पदार्पणाच्या सामन्यात 5 विकेट्स घेणारा तो भारताचा दहावा गोलंदाज ठरला आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 10 षटकांत 29 धावा देत 1 विकेट घेतली, ज्यामध्ये 2 षटके निर्धाव होती. फलंदाजी करतानाही मानवने 41 चेंडूत 28 मोलाच्या धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या सामन्यात त्याच्यापेक्षा जास्त षटकार फक्त ऋषभ पंतने (3 षटकार) मारले.
सामन्यानंतर बोलताना मानव सुथार म्हणाला की, ही भावना खरोखरच अविश्वसनीय आहे. क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून भारतासाठी कसोटी खेळण्याचे स्वप्न होते, जे आज पूर्ण झाले आहे. तो पुढे म्हणाला, जेव्हा मी फलंदाजीला गेलो, तेव्हा हळूहळू स्थिरावलो. पहिल्या 4-5 चेंडूंमध्येच मला समजले की खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करत आहे. माझी गोलंदाजी करताना योग्य लाईन आणि लेंथ राखण्यावर भर होता आणि त्यात मला यश मिळाले. या सामन्यातून मला शिकायला मिळाले की कसोटी क्रिकेट हे संयमाचे खेळ आहे.
आतापर्यंत भारताच्या फक्त 9 खेळाडूंना आपल्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार मिळाला आहे. 1992 मध्ये प्रवीण आमरे यांनी ही कामगिरी केली होती, तर 2023 मध्ये यशस्वी जयस्वालने शेवटच्या वेळी ही कामगिरी केली होती. आता या यादीत मानव सुथारचेही नाव जोडले गेले आहे. ज्या भारतीय खेळाडूंनी आपल्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकला आहे.
Comments are closed.