FIFA World Cup 2026 आजपासून जग गोल फिरणार … जगावर ताबा घेण्यासाठी फुटबॉलच्या महासंग्रामाची चढाई

आजपासून पृथ्वी गोल आहे हे भूगोलाच्या पुस्तकामुळे नव्हे, तर फुटबॉलमुळे सिद्ध होणार आहे. कारण पुढचे सात आठवडे जगाच्या कानाकोपऱयात एकाच चेंडूभोवती अब्जावधी नजरा फिरणार आहेत. घडय़ाळाचे काटे वेळ दाखवतील, पण जगाची धडधड 90 मिनिटांच्या तालावर चालेल. अवघं जग पुढील 50 दिवस फुटबॉलभोवती गोल फिरणार. फुटबॉलच्या फिफा वर्ल्ड कपची पहिली गर्जना आज मेक्सिको सिटीतून होणार असून या महागर्जनेत काही जण मैदानावर घाम गाळतील, तर अब्जावधी लोक टीव्ही, मोबाईल आणि स्टेडियमच्या आसनांवरून आपल्या भावनांचा उद्रेक करतील. काही देशांत सकाळचा चहा फुटबॉलसोबत पचेल, तर काही ठिकाणी मध्यरात्रीची झोप फुटबॉलसाठी बलिदान दिली जाईल. कार्यालयांमध्ये अचानक ’सर्दी’ वाढेल, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची ‘गोलपोस्ट’ हलतील आणि जगभरातील घराघरांतून एकच आवाज घुमेल… गोल. जणू अवघ्या जगाचा एक धर्मच असेल, तो म्हणजे फुटबॉल.

अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांच्या खांद्यावर उभी राहिलेली ही स्पर्धा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. प्रथमच 48 संघ मैदानात उतरणार असून 104 सामन्यांचे महायुद्ध एकाच वेळी तिन्ही देशांत धडाडणार आहे. सर्वाधिक 78 सामने अमेरिकेत होत असले तरी उद्घाटनाचा मान मेक्सिको सिटीला मिळाला आहे. यजमान मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उद्घाटनीय लढतीने फुटबॉल महायुद्धाची ठिणगी पडेल.

अवघ्या जगाचे होणार विभाजन

वर्ल्ड कपच्या महासंग्रामात पुढचे सात आठवडे अवघं जग दोन भागांत विभागली जाईल. एक भाग खेळणार आणि दुसरा भाग पाहणार! पण दोघांच्याही शिरांतून वाहणारं रक्त ते फुटबॉलचंच असेल. या स्पर्धेतील सर्वाधिक 78 सामने अमेरिकेतील 11 शहरांमध्ये रंगतील तर मेक्सिको आणि पॅनडात प्रत्येकी 13 सामने खेळविले जातील. सर्वाधिक 9 सामने डल्लासच्या स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. तसेच अटलांटा, न्यूयॉर्क, लॉस एंजलिस येथे प्रत्येकी आठ सामने होतील.

व्हिसा, तिकिटांच्या दरवाढीमुळे संताप

या स्पर्धेनिमित्ताने अमेरिकेने तिकिटांचे दर लाखांच्या घरात ठेवल्यामुळे जगभरातील चाहते प्रचंड संतप्त झाले आहेत, तर व्हिसा प्रक्रियाही किचकट केल्यामुळे हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी आपला वर्ल्ड कप दौरा रद्द केला आहे. याचा फटका अमेरिकेला बसला असल्यामुळे परदेशी पर्यटकांची संख्या तुलनेने कमी असेल. हॉटेल आणि अन्य निवास व्यवस्थेनेही फुटबॉल चाहत्यांना लुटण्याचा प्लॅन केल्यामुळे चाहत्यांमुळे यशस्वी ठरणारी ही स्पर्धा किती यशस्वी होते, ते येत्या आठवडय़ातच कळेल.

जुने तेच सुपरस्टार्स

यंदा वर्ल्ड कपमध्ये अनेक नव्या दमाचे खेळाडू चमकतीलच, पण तरीही सर्वांच्या नजरा जुनं ते सोनं प्रमाणे अनेक सुपरस्टार्सवर खिळल्या आहेत. फ्रान्सचा वेगवान वादळ किलियन एमबाप्पे, इंग्लंडचा ज्यूड बेलिंगहॅम, स्पेनचा तरुण जादूगार लामिन यामल, ब्राझीलचा विनिसियस ज्युनियर, नॉर्वेचा गोलमशीन एार्ंलग हालांद आणि पोर्तुगालचा अजूनही न थकलेला योद्धा ख्रिस्तियानो रोनाल्डो. काहींसाठी हा पहिला वर्ल्ड कप असेल, तर काहींसाठी अखेरचा. म्हणूनच प्रत्येक किक, प्रत्येक गोल आणि प्रत्येक अश्रू इतिहासात नोंदवले जाणार आहेत.

Comments are closed.