US-Iran War – होर्मुझजवळ अमेरिकेचा जहाजावर हल्ला, बेपत्ता असलेल्या 3 हिंदुस्थानींपैकी दोघांचा मृत्यू; एकाचा शोध सुरू
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ बुधवारी आणखी एका तेलवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला होता. यावळी त्या जहाजावर एकूण 28 खलाशी होते. यापैकी 24 हिंदुस्थानी असून त्यापैकी 21 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली होती तर, तीन हिंदुस्थानी बेपत्ता होते. या बेपत्ता हिंदुस्थांनींबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ जहाजावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात दोन हिंदुस्थानी खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जहाजाचे चीफ इंजिनिअर अद्याप बेपत्ता आहेत.
हिंदुस्थान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’ने सागरी कंपन्यांच्या हवाल्याने या दुर्दैवी घटनेला दुजोरा दिला आहे. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात काम करणाऱ्या हिंदुस्थानी खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
परराष्ट्र मंत्रालय आणि ‘फॉर्वर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’ कडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या जहाजावर हा हल्ला झाला त्याचे नाव ‘एमटी सट्टेबेलो’ असे असून त्यावर पलाऊ या देशाचा ध्वज होता. सट्टेबेलो हे जहाज ओमानमधील सोहार बंदरापासून 37 किलोमीटर सागरी अंतरावर असताना क्षेपणास्त्र हल्ला झाला.
मृत व बेपत्ता खलाशांची ओळख पटली
हिमाचल प्रदेशचे राहणारे 23 वर्षीय आदित्य शर्मा आणि उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी शिवानंद चौरसिया या दोन हिंदुस्थानींचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तर आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले चीफ इंजिनिअर पटनाला सुरेश यांचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. त्यांटा शोध सुरू असून संबंधित यंत्रणा आणि बचाव पथके समुद्रात सातत्याने शोध मोहीम राबवत आहेत.
Comments are closed.