‘एल-निनो’ने अडवली मान्सूनची वाट, पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मान्सून सध्या रत्नागिरीतच अडकला आहे. मान्सून उत्तरेकडे सरकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले नाही. या परिस्थितीस ‘एल-निनो’ ही हवामानाची परिस्थिती जबाबदार आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनचे आगमन लांबले आहे. मुंबईत पुढील दोन दिवस प्रचंड उकाडा सहन करावा लागणार असून विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.

देशातील शेती प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून आहे. यावर्षी ‘एल-निनो’मुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यंदा कोकणात मान्सून उशिरा दाखल झाला. त्यानंतर पुढील वाटचाल रखडली आहे. यासाठी ‘एल-निनो’ जबाबदार आहे. ‘एल-निनो’मुळे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातील आर्द वारे देशाकडे ओढले जात नाहीत. त्यामुळे मान्सून कमकुवत होतो. सध्या ही परिस्थिती सक्रिय झालेली आहे. कोकणात दाखल झाल्यानंतर रविवार 7 जूनपर्यंत मुंबईत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, आज हवामान खात्याच्या पुढील चार दिवसांच्या अंदाजानुसार, 13 जूनपर्यंत मुंबईत पावसाची शक्यता नाही. 14 जूननंतर दोन-तीन दिवस तुरळक पावसाचा अंदाज आहे. कोकणातही तुरळक पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तापमान आणखी वाढणार

जागतिक हवामान संघटनेने ‘एल-निनो’ सक्रिय झाल्याचा इशारा दिला आहे. जून महिन्यातील ताज्या आकडेवारीनुसार, ‘एल-निनो’चा निर्देशांक सध्या 0.81 अंश सेल्सिअसवर आला आहे. हा 0.80 अंश सेल्सिअस या किमान पातळीच्या वर आहे. हे तापमान हळूहळू वाढत जाणार आहे. त्याच्या प्रभावामुळे प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान वाढणार आहे. परिणामी देशात मान्सून कमकुवत होईल, कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टीची शक्यता आहे. चिंताजनक बाब म्हणजे, जून ते ऑगस्ट या कालावधीच हे ‘एल-निनो’चा सक्रिय होणार असून सप्टेंबरमध्ये त्याचा प्रभाव आणखी तीव्र होईल, असा जागतिक हवामान संघटनेचा अंदाज आहे.

Comments are closed.