कोर्टाने घराचा ताबा दिला, अन् तासाभरातच पोटच्या मुलाने 84 वर्षीय वडिलांचा काढला काटा; छ. संभाजी
छत्रपती संभाजीनगर गुन्हा: मालमत्तेच्या वादातून रक्ताची नाती किती टोकाला जाऊ शकतात, याचे एक अत्यंत विदारक आणि थरकाप उडवणारे उदाहरण छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात समोर आले आहे. न्यायालयाने घराचा ताबा वृद्ध आई-वडिलांच्या बाजूने देण्याचा आदेश दिला; मात्र याचाच राग मनात धरून पोटच्या मुलाने केवळ एका तासाच्या आत 84 वर्षीय वृद्ध वडिलांना धारदार शस्त्राने वार करून संपवले. ही धक्कादायक घटना रेल्वे स्टेशन परिसरातील (Railway Station) अबरार कॉलनी येथे घडली आहे. जाफर कमरुद्दीन पटेल सय्यद (वय 84) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी (Satara Police) मुख्य संशयित आरोपी मुलगा अब्दुल रहेमान अब्दुल जाफर याला अवघ्या दीड तासात बेड्या ठोकल्या आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Crime: काय आहे नेमके प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत जाफर सय्यद हे जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना पत्नी, चार मुली आणि तीन मुलगे असा मोठा परिवार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांचा एक मुलगा अब्दुल रहेमान हा मालमत्तेसाठी आपल्या वृद्ध आई-वडिलांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. त्याने काही काळापूर्वी आई-वडिलांना बळजबरीने घराबाहेर काढून संपूर्ण घराचा ताबा स्वतःकडे घेतला होता. स्वतःच्या घरातूनच बेदखल झाल्यामुळे हे वृद्ध दाम्पत्य हलाखीच्या परिस्थितीत पुण्यातील आपल्या इतर मुला-मुलींकडे आश्रयाला राहत होते.
Chhatrapati Sambhajinagar Crime: न्यायालयाच्या निकालानंतर तासाभरातच काढला काटा
आपल्या हक्काच्या घरासाठी जाफर सय्यद यांनी न्यायालयाचा (Court) दरवाजा ठोठावला होता. कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने जाफर सय्यद आणि त्यांच्या पत्नीला घराचा ताबा परत देण्याचे आदेश दिले. न्यायालयाचा आदेश येऊन तासाभर उलटत नाही तोच मुलाने आपल्या वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जाफर सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला.
Chhatrapati Sambhajinagar Crime: आरोपी पडेगावातून जेरबंद
या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शहरात तात्काळ नाकेबंदी केली आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली. सातारा पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत आरोपीला पडेगाव परिसरातून ताब्यात घेतले. या हृदयद्रावक आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केवळ मालमत्तेच्या हव्यासापोटी एका मुलाने आपल्या जन्मदात्याची जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!
Comments are closed.