भाजप आमदारांच्या पत्रकार परिषदेवर सामूहिक बहिष्कार; जालन्यातील पत्रकारांचा स्वाभिमानी निर्णय, वेळ देऊनही तासभर वाट बघायला लावली

संपूर्ण देशाला असुरी ताकदीच्या जोरावर पायाशी लोळण घ्यायला भाग पाडणाऱ्या भाजपला जालन्यातील पत्रकारांनी चांगलाच धडा शिकवला. वेळ देऊनही तासभर वाट बघायला लावल्यामुळे पत्रकारांनी वेळेचे भान नसलेल्या भाजप आमदारांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घातला. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी विनवणी करूनही पत्रकारांनी आपला निर्णय बदलला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कारकीर्दीची माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीने गुरुवारी सकाळी ११.३० वाजता हॉटेल सॅफ्रॉन येथे पत्रकार परिषद बोलावली होती. आमदार बबनराव लोणीकर आणि आमदार नारायण कुचे हे पत्रकार परिषद घेणार होते. पत्रकार परिषदेसाठी पत्रकार वेळेवर पोहोचले, मात्र दोन्ही आमदार बेपत्ता होते. सुरुवातीला काही मिनिटांचा विलंब होईल, असे मानून पत्रकारांनी संयम दाखवला. परंतु, अर्धा तास उलटल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. उपस्थित पत्रकारांनी आयोजकांकडे चौकशी केली असता, ‘आमदार रस्त्यात आहेत’, ‘लवकरच पोहोचतील’ असे सांगून वेळ मारून नेण्यात आली.

सकाळी ११.३० वाजता सुरू होणारी पत्रकार परिषद दुपारी १२.३० पर्यंतही सुरू झाली नाही. त्यामुळे पत्रकारांमध्ये चलबिचल सुरू झाली. अखेर संयमाचा अंत झाल्यामुळे पत्रकारांनी पत्रकार परिषदेवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांना बोलावून निष्कारण वाट पाहण्यास लावणे हे योग्य नाही, त्यामुळे आम्ही पत्रकार परिषद सोडून जात आहोत, असे सर्व पत्रकारांनी एकमुखाने भाजप पदाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

पत्रकारांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सांगताच तेथे उपस्थित असलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे चेहरेच पडले. या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्रकारांनी ठाम भूमिका घेत पत्रकार परिषदेचे ठिकाण सोडले.

बहिष्कार कोणाविरोधात नाही, पत्रकारांच्या सन्मानासाठी

जालन्यातील पत्रकारांनी घेतलेली भूमिका ही कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा विचारधारे विरोधातील नसून पत्रकारांच्या स्वाभिमान, सन्मान आणि वेळेच्या महत्त्वासाठी घेतलेली भूमिका आहे. पत्रकार परिषदेसाठी वेळ देण्यात आली असेल तर त्या वेळेचे पालन करणे हे आयोजकांचे कर्तव्य आहे.

दीपक शेळके, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र

Comments are closed.