दुखापतीमुळे हार्दिक पांड्याच्या कारकिर्दीवर संकट! तिन्ही फॉरमॅटमधून बाहेर पडल्याने पुनरागमनावर प्रश्नचिन्ह?

हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya Cricket carrier) क्रिकेट कारकिर्दीवर सध्या संकटाचे सावट आहे. तो सध्या भारतीय संघातील कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळत नाही. हार्दिक बऱ्याच काळापासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही, आता तो वनडे टीममधूनही अचानक बाहेर झाला आहे आणि आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठीही त्याची निवड झालेली नाही. त्यामुळे हार्दिक पुन्हा कधी आणि कसा कमबॅक करणार, याबद्दल आताच काही सांगता येणार नाही.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 2017 मध्ये कसोटीमध्ये पाऊल ठेवले, पण 2018 नंतर त्याने एकही कसोटी सामना खेळला नाही. आपल्या 11 कसोटीच्या कारकिर्दीत त्याने 532 धावा केल्या, ज्यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आपली शेवटचा वनडे सामना मार्च 2025 मध्ये ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या फायनलमध्ये खेळला होता.

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी हार्दिकची निवड झाली होती, पण अट ही होती की तो पूर्णपणे फिट असावा. फिट होण्यासाठी तो एनसीए (NCA) मध्ये गेला आणि काही दिवसांत फिट झालाही, पण दुसऱ्याच दिवशी बातमी आली की त्याची जुनी दुखापत पुन्हा बळावली आहे. त्यामुळे तो अफगाणिस्तान मालिकेबाहेर झाला आहे. मात्र, यावर बीसीसीआयने अधिकृत अपडेट दिलेले नाही.
टी-20 हा हार्दिकचा सर्वात आवडता प्रकार आहे. त्याने मार्च 2026 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता, त्यानंतर तो आयपीएलमध्ये व्यस्त होता. आता बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम जाहीर केली, तेव्हा त्यात हार्दिकचे नाव नव्हते. याचा अर्थ तो सध्या टी-20 सुद्धा खेळणार नाही. आता हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त होऊन टीम इंडियात कधी परततो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.