ठाकरेंच्या शिवसेनेचंही काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार; रवी राणांचा खळबळजनक दावा
अमरावती : राज्यात विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीत एकसुत्रता दिसून येत नाही. कारण, काही ठिकाणी मविआच्या उमेदवारांनी थेट माघार घेतल्याने महायुतीच्या 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यातच, गेल्या दोन दिवसांपासून शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याची चर्चा जोरदार सुरू होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भूमिका मांडताना हे वृत्त फेटाळले आहे. “नाना पटोले यांनी आधी काँग्रेसची मूठ बांधावी, स्वतःचा पक्ष मजबूत करावा आणि राष्ट्रवादीची काळजी करण्याची गरज नाही,” असा टोला शिंदे यांनी लगावला आहे. मात्र, आमदार रवी राणा (Ravi rana) यांनी राष्ट्र्रवादीसह ठाकरेंच्या शिवसेनेचेही (Shivsena UBT) विलिनीकरण होणार असल्याचा दावा केला आहे.
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, तसा प्रस्ताव सुद्धा दिला असून सोनिया गांधी त्यावर विचार करत आहेत. ज्या काँग्रेसमधून आलो त्याच्यात जाण्याची सुद्धा शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याचे भाष्य केले. तसेच, उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात संजय राऊत हे सोनिया गांधींशी भेटल्याचा खळबळजनक दावाच रवी राणा यांनी केलाय.
उबाठा काँग्रेसमध्ये विलिनीकरण
संजय राऊत 10 जनपथ वर नेहमी जातात, उद्धव ठाकरे सुद्धा अनेकवेळा तिथे गेले आहेत, सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांनी बैठका घेतल्या आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही सेक्युलर झालेली असून वेगवेगळं राहण्यापेक्षा भाजपला थांबवण्यासाठी एकत्र कळप होत आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली. उबाठा काँग्रेसमध्ये विलीन करून एकाच पक्षांमध्ये राहून संजय राऊत काँग्रेसमध्ये काम करतील. लवकरच उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं रवी राणा यांनी म्हटलंय.
अमरावतीत काँग्रेसची नामुष्की – राणा
अमरावती विधान परिषद निवडणुकीसंदर्भात हर्षजीत देशमुख ज्या पद्धतीने बोलले मला असं वाटते की, निवडणूक लढायची त्यांची मानसिकता नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी एखाद्याला पाठिंबा देणे म्हणजे काँग्रेसची नामुष्की होईल. काँग्रेसची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे. उमेदवार रुग्णालयात आहेत, त्यामुळे नेतेही हतबल झालेले आहेत, असा टोलाच रवी राणा यांनी हर्षजीत देशमुख आणि काँग्रेसला लगावला.
राष्ट्रवादीने विलिनीकरणाचे वृत्त फेटाळले
काँग्रेसमध्ये पक्षविलिनीकरणाच्या चर्चांवरून राजकीय वातावरण तापलं असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. “नाना पटोले यांनी आधी काँग्रेसची मूठ बांधावी, स्वतःचा पक्ष मजबूत करावा आणि राष्ट्रवादीची काळजी करण्याची गरज नाही,” असा टोला शिंदे यांनी लगावला आहे.
हेही वाचा
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.