तुकाराम मुंढे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; गुटखा विक्रेत्यांवर आता मकोका लागणार, अधिकाऱ्यांनाही इशारा

मुंबई : राज्यातील धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी जबाबदारी सांभाळताच, कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या महिनाभरात तुकाराम मुंढेंनी एकापाठोपाठ एक कारवाया करत 3 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 35 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतरही राज्यातील काही ठिकाणी अवैध गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री होत असल्याने आता आयुक्त मुंढे आणखी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आता, उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे तुकाराम मुंढेंनी म्हटलं.

तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न व औषध विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा माल जप्त केला आहे. संबंधित विक्रेत्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. वर्तमानपत्रात -खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) रडारवर आले आहेत. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकू नका, अशी सक्त ताकीदही खाद्यविक्रेत्यांना देण्यात आली आहे. आता, गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्कविरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 (मकोका) लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंनी निर्देश दिले आहेत. उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांना हा नियम लागू असून मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. मकोका गुन्हा दाखल करण्यासाठी आरोपीचा इतिहास पाहून आवश्यक त्या गुन्ह्यानुसार कारवाई केली जाणार, असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवून, वाहतूक , वितरण आणि विक्री करणाऱ्या संघटीत नेटवर्क विरोधात मकोका लागू करण्याचे आदेश तुकाराम मुंढेंकडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ही संघटित गुन्हेगारी आहे, त्यामध्ये विक्री करणारा आणि विकत घेणारा देखील जबाबदार आहे, अशी माहिती तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, यामध्ये आमचे काही अधिकारी देखील इनवॉल्ड आहेत, असे आरोप होत आहेत. मात्र, याची देखील चौकशी आम्ही करतोय, अधिकारी जर सहभागी असल्याचे आढळले तर तुम्हाला सांगण्यात येईल, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच मुंढेंनी दिला आहे.

3 कोटी 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारल्यानंतर 25 मे ते 11 जून या कालावधीत प्रतिबंधक गुन्ह्यामध्ये 3 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये, 35 जणांवर गुन्हे दाखल असून 350 जणांना अटक करण्यात आली आहे.

मला कुठलीही धमकी नाही, तो व्हिडिओ जुना

दरम्यान, मला कोणतीही धमकी आली नाही, मला धमकी आल्यासंदर्भातील तो व्हीडिओ जुना असून कदाचित पुण्यातला असेल, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी स्वत: आजच्या पत्रकार परिषदेत दिली.

Comments are closed.