तब्बल 33 वर्षानंतर आली प्रशासनाला जाग, मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर तीन गुन्हे दाखल

बुलढाणा क्राईम न्यूज : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रामकृष्ण परमहंस मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या (Paramhansa Ramkrishna Maunibaba Shikshan Sanstha) विश्वस्तांवर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार (Bogus certificate case) केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तीन शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे मात्र 33 वर्ष जुन्या मौनी बाबा शिक्षण संस्थेबाबत जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.1992 साली म्हणजेच 33 वर्षांपूर्वी अनुराधा अभियांत्रिकी आणि अनुराधा पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या इमारतींचे बनावट भोगवटा प्रमाणपत्र (Occupancy Certificate) तयार करून त्याचा शासकीय कामात वापर केल्याचा ठपका विश्वस्थांवर ठेवण्यात आला आहे. नगर परिषद चिखलीच्या प्रभारी नगर रचना सहाय्यक कांचन हिरामण राठोड यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादी वरून चिखली पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) 1860 च्या कलम 420, 465, 468 आणि 471 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसरा गुन्हा पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी नितीन शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला त्यांच्या तक्रारीनुसार विश्वस्त मंडळाने कट रचून 1992 पासून अनुराधा इंजीनियरिंग कॉलेज व अनुराधा पॉलिटेक्निक करिता परवानगीसाठी जोडलेले प्रमाणपत्र बनावट तयार करून खरे असल्याचे भासवून त्याआधारे परवानगी प्राप्त केली. सदर परवानगीचे आधारे शासनाकडून निधी प्राप्त केल्याचे निष्पन्न झाला आहे. तर तिसरा गुन्हा तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी भगवान पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल झाला आहे या तक्रारीत म्हटले आहे की बनावट दस्तावेज सादर करून शासनाचा निधी लाटल्याचा निष्पन्न झालं आहे.

Buldhana Crime : नेमकं प्रकरण काय? प्रकरणाची पार्श्वभूमी

चिखली येथील साकेगाव मार्गावरील अनुराधानगर येथील गट क्र. 117 आणि 118 मधील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, तसेच गट क्र. १४१ मधील अनुराधा पॉलिटेक्निक महाविद्यालय हे नगर परिषदेच्या हद्दीबाहेर आहेत. या महाविद्यालयांच्या इमारतींच्या बांधकाम परवानगीची कोणतीही नोंद नगर परिषदेच्या बांधकाम परवानगी नोंदवहीत आढळून आलेली नाही. तसेच, या इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्रही (Occupancy Certificate) नगर परिषदेच्या कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध नाही. बुलढाणा येथील मा. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 8 जून 2026 रोजी प्राप्त झालेल्या पत्रानुसार झालेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. गैरअर्जदारांनी 1992 सालापासून या इमारतींचे बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करून त्याचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि चिखली नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी 10 जून 2026 रोजी दिलेल्या प्राधिकृत पत्रानुसार हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यानचिखली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे चिखली शहर व शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 33 वर्षापासून मौनी बाबा शिक्षण संस्थेकडून नामांकित असं अनुराधा इंजीनियरिंग कॉलेज व पॉलिटेक्निक कॉलेज सुरू आहे.

Buldhana Crime News : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

याचप्रमाणे चिखली तहसील मधील मंडळ अधिकारी भगवान पवार व चिखली येथील पंचायत समितीतील विस्तार अधिकारी नितीन शेळके यांनी दिलेल्या वेगवेगळ्या तक्रारीवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यामुळे मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर वेगवेगळ्या तीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

गुन्हा 1) Cr. क्रमांक – 525 शहर निर्माते कांचन राठोड.

गुन्हा 2 ) Cr. No – 528, मंडळ अधिकारी, भगवान पवार, तहसील कार्यालय चिखली.

गुन्हा 3 ) Cr No – 529, विस्तार अधिकारी, नितीन शेळके, पंचायत समिती, चिखली.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.