शिवम दुबेनं मोक्याच्या क्षणी फेकली विकेट, तिथेच गेम फिरवला, मराठा रॉयल्सने राखले विजेतेपद; तुषा

T20 मुंबई 2026 फायनल : ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत पार पडलेल्या टी-20 मुंबई लीगच्या रोमांचक अंतिम सामन्यात गतविजेत्या मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सने आपला दबदबा कायम राखला आहे. शनिवारी झालेल्या या अंतिम लढतीत मराठा रॉयल्सने आर्क्स अंधेरी संघावर 8 धावांनी मात करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. चिन्मय सुतारचे झुंजार अर्धशतक आणि तुषार देशपांडेच्या नेतृत्वाखालील शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर रॉयल्सने हा रोमहर्षक विजय साकारला.

दुसरीकडे, याच दिवशी महिलांच्या क्रिकेटमध्येही नवा इतिहास रचला गेला. पहिल्या टी-20 मुंबई महिला लीगच्या अंतिम सामन्यात सोबो मुंबई फाल्कन्सने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स संघाला 25 धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या भव्य बक्षीस वितरण समारंभाला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक, लीग नियामक परिषदेचे अध्यक्ष राजदीप गुप्ता आणि इतर अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

सुतार-लाड यांची महत्त्वपूर्ण भागीदारी (T20 Mumbai 2026 Final)

31,000 हून अधिक क्रिकेट चाहत्यांच्या उपस्थितीत खेळल्या गेलेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात आर्क्स अंधेरीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्जुन तेंडुलकरने सुरुवातीलाच अचूक मारा करत मराठा रॉयल्सला दोन मोठे झटके दिले. त्यामुळे पहिल्या तीन षटकांतच रॉयल्सची अवस्था २ बाद २९ अशी बिकट झाली होती.

अशा कठीण प्रसंगी चिन्मय सुतार आणि कर्णधार सिद्धेश लाड यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 65 धावांची महत्त्वपूर्ण आणि संयमी भागीदारी रचून संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला. लाडने 33 धावा केल्या. तर दुसरीकडे, चिन्मय सुतारने 52 चेंडूंचा सामना करत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने झुंजार अर्धशतकी खेळी केली आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. शेवटी तुषार देशपांडे आणि रोहन राजे मोठी आतषबाजी करू शकले नाहीत आणि मराठा रॉयल्सने 20 षटकांत 5 बाद 154 धावा केल्या.

दिव्यांश सक्सेनाची झुंज अपयशी; तुषारची प्रभावी गोलंदाजी (T20 Mumbai 2026 Final)

155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आर्क्स अंधेरीकडून फॉर्मात असलेल्या दिव्यांश सक्सेनाने एकहाती झुंज दिली. त्याने 51 धावांची प्रभावी अर्धशतकी खेळी केली. यंदाच्या हंगामात तीन अर्धशतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरला. दिव्यांशने अर्जुन तेंडुलकरसोबत (39 धावा) आणि प्रग्नेश कानपिल्लेवारसोबत (25 धावा) महत्त्वपूर्ण भागीदार्या केल्या. प्रग्नेशने 21 चेंडूंत वेगवान खेळी केली, पण डावखुरा फिरकीपटू आदित्य धुमाळने त्याला बाद करून अंधेरीला मोठा धक्का दिला. त्यानंतर दिव्यांशही तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर बाद झाला.

शिवम दुबेनं मोक्याच्या क्षणी फेकली विकेट (Shivam Dube wicket turning point)

सामन्यादरम्यान सिद्धेश लाडच्या हाताला दुखापत झाल्यामुळे वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने संघाचे नेतृत्व सांभाळले. अंधेरीची अवस्था 5 बाद 104 अशी झालेली असताना कर्णधार शिवम दुबेकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, कर्णधार देशपांडेने अप्रतिम गोलंदाजी करत दुबेला अवघ्या 15 धावांवर बाद केले आणि सामन्यावर रॉयल्सचे पूर्ण नियंत्रण मिळवून दिले. गौरव जठारने 23 धावा करत अंधेरीच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण रॉयल्सच्या गोलंदाजांनी दबावाखाली उत्कृष्ट मारा करत अंधेरीला 20 षटकांत 8 बाद 146 धावांवर रोखले.

हे ही वाचा –

T20 Mumbai 2026 Final : जर्सी काढून हवेत फिरवली, LIVE सामन्यात खेळाडू मारायला पळाले; अर्जुन तेंडुलकरच्या टीमसोबत फायनलमध्ये नेमकं काय घडलं?, सगळेच चक्रावले, VIDEO

Comments are closed.