रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, उडवली खिल्ली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. शेतकरी कर्जमाफीतील जाटक अटी काढून सरसकट कर्जमाफी करावी, ही मागणी घेऊन गेल्या दोन दिवसांपासून ते पंढरपुरात आंदोलनावर बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनास विविध शेतकरी संघटनांनी आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. तर, सत्ताधारी पक्षाचे नेते, आमदार रोहित पवारांचे आंदोलन ही नव्वळ नौटंकी असल्याची टीका करत आहेत. आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता भाजप आमदार परि फुके रोहित पवारांचे आंदोलन जरांगे पाटील स्टाईल नौटंकी असल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन म्हणजे केवळ ‘मनोज जरांगे पाटलांची स्टाईल मारण्याचा’ आणि ‘नौटंकी’ करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे. विशेष म्हणजे जरांगे पाटील समर्थकांकडून या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला आहे.

मीडिया त्याग आंदोलन करावे

​आमदार परिणय फुके यांनी रोहित पवारांच्या या आंदोलनावर टीका करताना म्हटले की, रोहित पवार जे उपोषणाला बसले आहेत, ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी किंवा त्यांच्या कोणत्याही खऱ्या प्रश्नांसाठी नाही. त्यांनी जे ‘अन्नत्याग आंदोलन’ सुरू केले आहे, त्याऐवजी त्यांनी आता ‘मीडिया त्याग आंदोलन’ करायला हवे, असा खोचक सल्लाही फुकेंनी दिला.

बंडखोरीच्या भीतीनेच उद्धव ठाकरेंची बैठक

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या तातडीच्या आणि महत्त्वाच्या बैठकीवर भाजपा आमदार डॉ. परिणय फुके यांनी जोरदार निशाणा साधला. “पूर्वी ज्याप्रमाणे आमदारांनी उठाव केला, तसाच उठाव आता खासदारही करतील या भीतीनेच उद्धव ठाकरे आपल्या खासदारांची चाचपणी आणि मोजणी करत आहेत,” असे त्यांनी म्हटले.

जरांगे पाटील पंढरपुरात

रोहित पवारांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू असताना जरांगे पाटील पंढरपूर दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे, जरांगे पाटील रोहित पवारांची भेट घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय विविध पक्षांचे नेते आमदार खासदारही दिवसभर रोहित पवार यांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे. सरकारकडून आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न सुरूच असून सध्या दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री दोघे रोहित पवार यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा

मातोश्रीवरील बैठकीला सर्वच 9 खासदार हजर, पण…; बैठकीनंतर संजय राऊतांनी सांगितली ‘इनसाईड स्टोरी’

Comments are closed.