जिवंत क्षेपणास्त्रासह तेलाचा टँकर भारतात आला

ओमानच्या किनाऱ्याजवळ हल्ला : 2,000 किमीचा प्रवास करत कोची येथे दाखल : भारतीय नौदलाने क्षेपणास्त्र हटवले

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय नौदलाने संयुक्त अरब अमिरातीच्या फुजैराह येथून कोचीकडे प्रवास करणाऱ्या एका तेलवाहू जहाजातून जिवंत क्षेपणास्त्र सुरक्षितपणे हटवून एक मोठा सागरी अपघात टाळला आहे. मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेल्या एमटी ऑलिम्पिक तेलवाहू जहाजावर 26 मे रोजी ओमानच्या किनाऱ्याजवळ हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर क्षेपणास्त्राच्या स्फोटक भागाचा स्फोट झाला नाही, परंतु त्याऐवजी ते जहाजाच्या बाह्य आवरणात घुसले आणि इंधनाच्या टाकीत अडकले. या जहाजाने अरबी समुद्रातून सुमारे 2,000 किलोमीटरचा प्रवास करून कोची गाठले. 11 जून रोजी भारतीय नौदलाने क्षेपणास्त्राचा स्फोटक भाग बाहेर काढण्यासाठी एक अत्यंत जोखमीची मोहीम राबवली, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

26 मे रोजी ओमानची राजधानी मस्कतपासून सुमारे 1.8 किलोमीटर अंतरावर जहाजाच्या डाव्या बाजूला पाण्याजवळ एक स्फोट झाला होता. टँकरच्या कामकाजासाठी जबाबदार असलेल्या स्प्रिंगफील्ड शिपिंग कंपनीने टँकरला एका अज्ञात वस्तूने धडक दिल्याचे सांगितले असले तरी, आतमध्ये एक जिवंत क्षेपणास्त्र अडकल्याचे आढळून आले. स्फोटामुळे टँकरमधील काही तेल समुद्रात सांडले. तथापि, टँकरने आपला प्रवास सुरूच ठेवला. दरम्यान, भारतीय नौदलालाही टँकरमध्ये क्षेपणास्त्र असल्याची माहिती देण्यात आली.

कोची येथील दक्षिण नौदल कमांडने स्फोटके निकामी करण्यात विशेषज्ञ असलेल्या एक्सप्लोझिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल टीमला घटनास्थळी पाठवले. संपूर्ण ऑपरेशनचे समन्वय गुरुग्राम येथील भारतीय नौदलाच्या इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर-इंडियन ओशन रीजन द्वारे करण्यात आले. क्षेपणास्त्राने तेल टँकरच्या बाह्य भागाला भेदून अनेक भागांचे नुकसान केले आणि अखेरीस ते इंधनाच्या टाकीत अडकले. अशा परिस्थितीत, एक छोटीशी चूक देखील मोठा स्फोट घडवू शकली असती, असे तपासात उघड झाले. जप्त केलेला वॉरहेड आता एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला असून, तिथे त्याची तपासणी केली जाईल.

Comments are closed.