टीम इंडियाचा नवा एक्स-फॅक्टर! या खेळाडूच्या प्रभावी कामगिरीवर सुनील गावस्कर खुश!

भारतीय वनडे संघात युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीचा (Nitish Kumar Reddy) प्रभाव वेगाने वाढत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने केलेल्या शानदार कामगिरीचे दिग्गज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही कौतुक केले आहे. 13 जून रोजी धर्मशाला येथे झालेल्या पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात भारताच्या 7 विकेट्सच्या विजयात रेड्डीने मोलाची भूमिका बजावली.

टॉस जिंकून कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानची सुरुवात जोरदार झाली होती, जिथे रहमानुल्लाह गुरबाजने 51 चेंडूत 102 धावा केल्या होत्या. जेव्हा अफगाणिस्तान मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते, तेव्हा रेड्डीने भारताला महत्त्वाचे यश मिळवून दिले. त्याने एक अचूक ‘यॉर्कर’ टाकून गुरबाजला बाद केले. आपल्या 4 षककाच्या स्पेलमध्ये 31 धावा देऊन 2 विकेट्स घेत त्याने सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने फिरवले. भारताने अफगाणिस्तानला 194 धावांवर रोखले आणि नंतर सहज विजय मिळवला.

सुनील गावस्कर यांनी जिओस्टारवर बोलताना सांगितले की, नितीश कुमार रेड्डीने अचूक यॉर्कर टाकून गुरबाजची महत्त्वाची विकेट घेतली. जेव्हा तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करू शकता, तेव्हा तुम्ही संघासाठी अतिशय मौल्यवान ठरता. यॉर्करमुळेच त्याने फलंदाजाला अडचणीत आणले. भारतीय संघातील त्याच्या महत्त्वावर भाष्य करताना गावस्कर म्हणाले, नितीश कुमार रेड्डीच्या रूपात भारताला एक असा खेळाडू मिळाला आहे, जो 5 व्या किंवा 6 व्या गोलंदाजाची भूमिका उत्तम बजावू शकतो. खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार तो कर्णधार आणि निवडकर्त्यांना अधिक पर्याय (flexibility) उपलब्ध करून देतो. फलंदाज म्हणून खेळवा किंवा गोलंदाज म्हणून, मी तयार आहे’ ही त्याची वृत्ती कोणत्याही संघासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

गेल्या वर्षभरात नितीश कुमार रेड्डीचा खेळ खूप सुधारला आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याने 302 धावा केल्या आणि 8 विकेट्स घेतल्या. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे तो भारतीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू बनला आहे.

Comments are closed.