Buldhana News – 18 जूनला मेहकरमध्ये शिवसेनेचा विराट मोर्चा, अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत हजारो शेतकरी उतरणार रस्त्यावर
राज्य शासनाने जाहीर केलेला शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय हा प्रत्यक्षात शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असून कर्जवसुलीला चालना देणारा आहे, अशी जोरदार टीका आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, त्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने १८ जून रोजी मेहकर येथे विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मेहकर व लोणार येथे आयोजित बैठकीत बोलताना आ. खरात म्हणाले की, सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने देणाऱ्या सरकारने आता त्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. अतिवृष्टीची मदत, पीक विमा, तसेच शेतमालाला हमीभाव या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अद्यापही ठोस निर्णय घेतले गेले नाहीत. त्यातच कर्जमुक्तीच्या नावाखाली नव्या अटी-शर्ती लादून शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी सरसकट देण्यात आली होती. मात्र, नव्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वीचे कर्ज वगळण्यात आले असून, दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आधी थकबाकी भरण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार असल्याचा दावा आ. खरात यांनी केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी १८ जून रोजी सकाळी १० वाजता मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.
या बैठकीस जिल्हा उपप्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, लोणार तालुकाप्रमुख राजू बुधवंत, युवासेना तालुका अधिकारी अॅड. आकाश घोडे, नगराध्यक्ष किशोर गारोळे तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आ. सिद्धार्थ खरात यांनी केले आहे.
Comments are closed.