Ratnagiri News – 48 तासात एक तरी स्मार्ट मीटर बसवून दाखवाच, शिवसेनेचा महावितरणला सज्जड दम
महावितरणच्या ठाणे शाखेकडून कोकणातील लाखो वीज ग्राहकांना ‘48 तासांत स्मार्ट मीटर बसवण्यात येणार’ असा संदेश पाठवण्यात आल्याने वीजग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रत्नागिरी येथील महावितरण कार्यालयावर धडक देत तीव्र निषेध नोंदवला.
या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सज्जड दम देत म्हटले की, “ग्राहकांना धमकीवजा संदेश पाठवून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. जर 48 तासांत स्मार्ट मीटर बसवण्याची भाषा करत असाल, तर पुढील 48 तासांत एक तरी स्मार्ट मीटर बसवून दाखवा. त्यानंतर शिवसैनिक काय करतात ते पाहा.” यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्यासह तालुकाप्रमुख मयुरेश पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हाधिकारी प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख किरण तोडणकर, शशी बारगोडे, महिला उपजिल्हा संघटक रशिदा गोदड, महिला शहर संघटक सेजल बोराटे, नगरसेविका फौजिया मुजावर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होतेय स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीबाबत पारदर्शकता राखावी आणि ग्राहकांच्या हिताचा विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Comments are closed.