Ratnagiri News – “नागरिकांना स्वच्छ पाणी द्या, कारणे नकोत”, गोवळकोटच्या खाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर शिवसेनेची नगरपालिकेत धडक
गोवळकोट हा चिपळूण नगरपरिषदेतील क्रमांक एकचा प्रभाग असून येथील पाणीटाकीतून शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र दरवर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यात गोवळकोटमधील नागरिकांना खाऱ्या व मचुळ पाण्याचा सामना करावा लागतो. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यापासून स्वयंपाक, कपडे धुणे आणि दैनंदिन वापरासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक माता-भगिनींना उन्हात विहिरींवरून पाणी आणण्याची वेळ आली असून आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत.
निवेदन सादर करताना प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी संजय जाधव आणि पाणीपुरवठा विभाग प्रमुख खाडे उपस्थित होते. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, माजी नगरसेवक व तालुका समन्वयक राजूशेठ देवळेकर, शहर सचिव प्रशांत मुळये, उपशहरप्रमुख राजू विखारे, राजन खेडेकर, मनोज पांचाळ विभागप्रमुख संकेत शिंदे, विकास गांगण, संतोष मिरगल, शाखाप्रमुख नवीनचंद्र किल्लेकर तसेच गोवळकोट प्रभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक संजय गोताड, फैसल कास्कर आणि नगरसेविका कांचन शिंदे यांनीही नागरिकांच्या प्रश्नाला पाठिंबा दर्शवत चर्चेत सहभाग घेतला. काँग्रेसचे नगरसेवक साजिद सरगुरोह हे देखील उपस्थित होते. तर सत्ताधारी पक्षाचे बांधकाम सभापती कपिल शिर्के, स्थानिक नगरसेवक उदय जुवळे आणि नगरसेवक विकी लवेकर हे देखील चर्चेदरम्यान उपस्थित होते.
चर्चेच्या सुरुवातीला विभागप्रमुख संकेत शिंदे यांनी निवेदनातील सर्व मुद्दे प्रशासनासमोर मांडले. त्यावर उत्तर देताना प्रशासनाने पाऊस लांबल्याने निर्माण झालेली परिस्थिती, उन्हाळ्याच्या सुरुवातीला विहिरींची साफसफाई केल्याची माहिती, पर्यायी नियोजन सुरू असल्याचे तसेच गोवळकोट भागात दिवसाला दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगितले. भविष्यात कायमस्वरूपी उपाय म्हणून ग्रॅव्हिटी पाईपलाईन योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून तात्पुरत्या पाईपलाईनसाठी काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी असल्याचेही प्रशासनाने नमूद केले. मात्र याचवेळी नगरपरिषद प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला. त्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेत नागरिकांच्या प्रश्नावर राजकारण न करण्याचा इशारा दिला.
“तुमच्या अडचणी आणि तुमचे राजकारण कौन्सिलमध्ये ठेवा. आम्ही येथे गोवळकोटमधील माता-भगिनींना गेल्या महिनाभरापासून सहन करावा लागणारा त्रास मांडण्यासाठी आलो आहोत. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही आणि प्रशासनाकडून फक्त नियोजनाच्या आणि तांत्रिक अडचणींच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. आम्हाला कागदावरील नियोजन नको, तर प्रत्यक्षात नागरिकांची समस्या सुटली पाहिजे,” अशी भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडली.
गोवळकोटच्या डोंगराळ भौगोलिक परिस्थितीचा उल्लेख करत पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. “चिपळूण नगरपरिषदेत ज्या महायुतीची सत्ता आहे, तेच सरकार राज्यात आणि केंद्रातही आहे. मग नागरिकांना अशा मूलभूत सुविधांसाठी त्रास का सहन करावा लागत आहे? डिजिटल इंडियाची भाषा केली जाते, मग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टँकरला जीपीएस बसवा, त्यांचे ट्रॅकिंग करा आणि प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचतोय का ते तपासा,” अशी मागणीही करण्यात आली.
या चर्चेमुळे नगरपालिकेतील प्रशासन आणि लोकनियुक्त प्रतिनिधींमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला. नागरिकांचा प्रश्न निकाली काढण्यापेक्षा जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे प्रकार सुरू असल्याचे चित्र या बैठकीतून दिसून आले. मात्र शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला तातडीने उपाययोजनांचे आश्वासन द्यावे लागले.
दरम्यान, नगरपालिकेने वाडीनिहाय टँकरचे नियोजन अधिक प्रभावी करण्याबरोबरच गावातील पिण्यायोग्य सर्व विहिरींची तातडीने साफसफाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र वर्षानुवर्षे कायम असलेल्या या खाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर यावेळी कायमस्वरूपी तोडगा निघतो का, याकडे गोवळकोटवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments are closed.