Nanded News – गोदावरी नदीपात्रात उपसा करणार्‍याविरुध्द कारवाई, 3 कोटी 21 लाख रुपयांचा ऐवज जप्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नांदेड ग्रामीण पोलीस आणि सोनखेड पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत काल रात्री गोदावरी नदीपात्रात वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई करुन पोलिसांनी तीन कोटी 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हा शाखा आणि सोनखेड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने काल रात्री सोनखेड आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत भनगी, पिंपळगाव, मार्वंड, गंगाबेट आदी ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रात छापा टाकला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जावून कारवाई केली. यात रेती काढण्याचे एकूण बारा इंजिन, रेती काढण्याच्या एकूण ११ बोटी, २३७ तराफे आणि ३२ ब्रास रेती असा तीन कोटी २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी वाळू उपसा करणार्‍या आरोपींना पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पळून गेले.

यात आरोपी प्रसाद कळके, सचिन कळके, हॅप्पी शिलेदार, अमित हंबर्डे, अरुण लुटे, पवन येवले, मोहन येवले, रमेश गच्चे, रघुनाथ मोरे, पवन मोरे, भागवत मोरे, विकास डक, मनोज क्षीरसागर, विवेक सोनटक्के, मोतीराम सोनटक्के, कुंडलिक सोनटक्के यांच्याविरुध्द ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, ओमकांत चिंचोलकर, भागवत नागरगोजे यांच्या पथकाने केली. पोलीस अधीक्षकांनी या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.