राज्यसभा निवडणुकीत एनडीएला यश.
26 पैकी जिंकल्या 19 जागा, काँग्रेसची पिछेहाट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राज्यसभा निवडणुकांच्या नुकत्याच झालेल्या फेरीत भारतीय जनता पक्षासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 26 जागांपैकी 19 जागा जिंकून घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे ही आघाडी आता या सभागृहात दोन तृयियांश संख्याबळाच्या नजीक आली आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या आघाडीला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. तर मिझोराम पीपल्स मूव्हमेंटने 1 जागा जिंकली. दोन तृतियांश बहुमतासाठी आता आघाडीला 13 जागा हव्या आहेत.
राज्यसभेचे संख्याबळ सध्या 245 आहे. दोन तृतियांश बहुमतासाठी 163 जागांची आवश्यकता आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सध्या 150 जागांवर पोहचली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये या आघाडीला 2 जागा अतिरिक्त मिळाल्या आहेत. या जागांपैकी 1 झारखंडमध्ये तर एक मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने 1 जागा जास्तीची मिळाली आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीची अपेक्षेपेक्षा अधिक हानी झाल्याचे दिसून येत आहे.
झारखंडमध्ये विरोधकांना दणका
81 सदस्य असलेल्या झारखंड विधानसभेतून राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक नुकतीच घेण्यात आली. या दोन्ही जागा विरोधकांना मिळणे, त्यांच्या संख्याबळानुसार अपेक्षित होते. तथापि, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या समर्थनाच्या आधारावर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारचा पराभव झाला. या निवडणुकीत विरोधी पक्षांची किमान चार मते फुटल्याचे आणि तीन मते अवैध ठरल्याचे स्पष्ट झाले असल्याने काँग्रेसला पुन्हा दणका बसला.
जागांची संख्या वाढणार
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागांची संख्या आणखी वाढणार आहे. कारण तृणमूल काँग्रेसच्या 13 पैकी चार राज्यसभा खासदारांनी त्यांचे सदस्यत्व सोडले आहे. हे नेते आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून पश्चिम बंगाल विधानसभेतून पोटनिवडणुकीच्या माध्यमातून निवडून येऊ शकतात. त्यामुळे आगामी काही काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडी राज्यसभेत अधिक वाढणार आहे. लोकसभा मतदारसंघांचे परिसीमन करुन त्यांची संख्या वाढविणे, महिलांसाठी 1 तृतियांश आरक्षण आदी विधेयकांसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लोकसभा आणि राज्यसभेत दोन तृतियांश बहुमताची आवश्यकता आहे. त्या पातळीपर्यंत हे संख्याबळ पोहचल्यानंतर ही महत्वाची विधेयके संसदेत पुन्हा सादर होणार आहेत.
Comments are closed.