फक्त १५ दिवस थांबा : योगी आदित्यनाथ

अयोध्या मंदिरातील देणगी गैरप्रकारप्रकरणी वक्तव्य : एसआयटी चौकशीनंतर दोषींना कठोर शिक्षा

अयोध्येतील राम मंदिरात जमा होणाऱ्या देणग्यांच्या बाबतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि एसआयटी चौकशीदरम्यान शुक्रवारी पहिल्यांदा मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांनी यासंबंधी वक्तव्य केले आहे. आपण सर्वांनी राम मंदिरासाठी 500 वर्षांपर्यंत प्रतीक्षा केली आहे, आता 15 दिवस आणखी प्रतीक्षा करा, ट्रस्टच्या सूचनेनुसार एसआयटी स्थापन करण्यात आली असून तिच्या चौकशीतून सर्वकाही स्पष्ट होईल. कोणत्याही गुन्हेगाराला मोकळे सोडले जाणार नाही. पुढील 15 दिवसांपर्यंत कुठल्याही दुष्प्रचाराला बळी पडू नका, अयोध्येला बदनाम करणाऱ्यांचे शिकार ठरू नका, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येच्या रुदौली मतदारसंघात आयोजित सभेला संबोधित करताना केले आहे.

वृत्तसंस्था, अयोध्या

अयोध्येविषयी माध्यमांमधील वृत्तं पाहिल्यावर अन् ट्रस्टच्या सूचनेनंतर आम्ही एसआयटी स्थापन केली आहे. जोपर्यंत चौकशी सुरू राहिल, तोपर्यंत रामभक्तांच्या भावना दुखावणारे कुठलेही वक्तव्य केले जाऊ नये. कुणाकडे या गैरप्रकारांशी संबंधित पुराव असतील ते एसआयटीकडे सोपविण्यात यावेत. भगवान श्रीरामांनी मर्यादेचे पालन करण्याची प्रेरणा दिली आहे, अशास्थितीत सर्वांनी मर्यादेचे पालन करावे. चौकशीदरम्यान वक्तव्यं केल्याने चौकशी प्रभावित होते. चौकशीनंतर कुणाला काही सांगायचे असेल तर तो एसआयटीसमोर हजर राहू शकतो असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

अयोध्येला बदनाम करण्याचा प्रयत्न

अयोध्या आणि श्रीराम जन्मभूमीला बदनाम करू पाहणाऱ्या लोकांच्या दुष्प्रचाराला बळी पडू नये. रामभक्त आणि जय श्रीरामाचा नारा देणाऱ्यांवर गोळी झाडणारे आज आम्हाला उपदेश देत आहेत. हेच लोक अयोध्येला सन्मान मिळावा असे इच्छित नाहीत. हेच लोक अयोध्येला बदनाम करू पाहत आहेत. अयोध्या आणि येथील लोकांना अपमानित करू पाहत आहेत, असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘सप’साठी बाबर प्रिय

जे लोक रामभक्तांना अपमानित करत होते, गुन्हेगारांच्या थडग्यावर जात प्रार्थना म्हणत होते, ज्या लोकांनी आतापर्यंत राम जन्मभूमीत दर्शन घेतले नाही, स्वत:च्या आमदारांनाही अयोध्येत येण्यापासून रोखणारे लोक बाबरला मानणारे आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार मनोज पांडे यांनी सर्व आमदारांना अयोध्येत आणण्याची योजना जाहीर केली, तेव्हा अखिलेश यादव यांनी त्यांना फटकारले होते. मनोज पांडे यांना जाहीरपणे अपमानित केले होते. आता हेच मनोज पांडे आमच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. अखिलेश यादव कधी अयोध्येत आले आहेत का? अयोध्येला बदनाम करण्यासाठी अखिलेश यादव काय काय करत आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवावे. अखिलेश यांचा विचार दफनभूमी आणि दफनभूमीचे कुंपण उभारण्यापुरती मर्यादित आहे. आम्ही अयोध्येचा विकास करत आहोत, असे उद्गार योगींनी काढले आहेत.

काँग्रेस दुटप्पी

काँग्रेसचे नेते दुटप्पी आहेत, काँग्रेसने अयोध्येत राम मंदिर उभे राहू नये, याकरता पूर्ण जोर लावला होता. अयोध्येच्या ओळखीचे संकट काँग्रेसने उभे केले होते. आता हाच काँग्रेस पक्ष राम भक्तांचा अपमान झाल्याची ओरड करतोय. काँग्रेसकडून भगवान रामाचे अस्तित्व नाकारले जात असताना त्यांचा अपमान होत नव्हता का, असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे.

 

 

Comments are closed.