पदार्पणाच्या वनडे मालिकेत गुरनूर ब्रारचा ऐतिहासिक पराक्रम! कोणत्याही भारतीयाला न जमलेला रेकॉर्ड करत दिग्गजांना सोडलं मागे!

गुरनूर ब्रारने (Gurnoor brar) त्याच्या पदार्पणाच्या मालिकेत इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवत या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात एक विकेट मिळवताच, 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला.

गुरनूर ब्रारने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिन्ही सामन्यांत प्रत्येकी किमान एक विकेट घेतली. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने 27 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर लखनऊमध्येही त्याने आपली लय कायम राखत 3 फलंदाजांना बाद केले. तिसऱ्या वनडे सामन्यात मोहम्मद नबीला बाद करून त्याने या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला.

याआधी भारतासाठी पदार्पणाच्या वनडे मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या नावावर होता. दोघांनीही आपापल्या पहिल्या मालिकेत 6 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, आता गुरनूर ब्रारने त्यांना मागे टाकले आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत एकूण 7 विकेट घेतल्या आहेत.

7 विकेट – गुरनूर ब्रार (विरुद्ध अफगाणिस्तान)
6 विकेट – युजवेंद्र चहल (विरुद्ध झिम्बाब्वे, 2016)
6 विकेट – प्रसिद्ध कृष्णा (विरुद्ध इंग्लंड, 2021)

गुरनूर ब्रार 2025 च्या हंगामापासून आयपीएल (IPL) मध्ये गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे, मात्र त्याला अद्याप एकही सामना खेळायला मिळालेला नाही. मात्र, त्याआधी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 6 सामन्यांत 10 विकेट्स आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये 8 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या होत्या.

Comments are closed.