मंत्री प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, भाजप आमदाराकडून अश्लील पुल पार्टीचं आयोजन, व्हिडिओही शेअर
पालघर : गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी हा वाद शमल्याचं दिसून आलं होता. आता, प्रताप सरनाईक यांनी केलेल्या ट्विटमुळे आणि शेअर केलेल्या व्हिडिओमुळे दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. यंदा अल निनोमुळे मान्सून लांबणीवर गेला असून राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचे (Water) संकट गडद होतानाचा चित्र आहे. शेतकरी तसेच नागरिक पाण्यासाठी संघर्ष करत असताना, मिरा-भाईंदर येथील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सरनाईक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण करत आहे. पाण्याअभावी शेतकरी होरपळत आहे. मिरा-भाईंदरमधील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अशा भीषण परिस्थितीत माझ्या मतदारसंघातील आमदार नरेंद्र मेहता यांनी सेवन इलेव्हन क्लबमध्ये अश्लील पूल पार्टीचे आयोजन केले आहे. रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता, अशीच ही परिस्थिती आहे. या व्यापारी वृत्तीला काय म्हणावे?” अशी टीका सरनाईक यांनी केली आहे. या पार्टीच आयोजन 27 जून रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात आलं आहे. या पोस्टमधून सरनाईक यांनी पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. दरम्यान, या आरोपांमुळे मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नरेंद्र मेहतांच्या भूमिकेकडे लक्ष
सरनाईक यांनी केलेल्या आरोपांवर आमदार नरेंद्र मेहता किंवा संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले असून पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
व्हिडिओमध्ये काय?
प्रताप सरनाईक यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक स्विमिंग पुल पाहायला मिळत असून, या पुलामध्येच पार्टीचं नियोजन करण्यात आल्याचं दिसून येत आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ह्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं असून 27 जून रोजी 4 वाजता पार्टीला सुरुवात होत आहे. आंतरराष्ट्रीय डिजे प्लेअर येथे येणार असून मोठी पार्टी होत असल्याचं व्हिडिओतील व्यक्ती सांगत आहे. या पार्टीसाठी बुकींग करण्याचं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आलंय. मात्र, या व्हिडिओत कुठेही कुठल्या नेत्याचा किंवा आमदाराचा उल्लेख दिसून येत नाही.
संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण करतोय. पाण्याविना शेतकरी येथे होरपळत आहे. मिरा भाईंदरकरांचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. अशी भीषण अवस्था असताना माझ्या मतदार संघातील आमदार नरेंद्र मेहता यांनी सेवन इलेव्हन क्लबमध्ये अश्लील पूल पार्टीचे आयोजन केले आहे. हे म्हणजे रोम जळत… pic.twitter.com/70CUlWB7Gk
— प्रताप बाबुराव सरनाईक (@PratapSarnaik) 20 जून 2026
हेही वाचा
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Comments are closed.