मी तीन दिवसांपूर्वी तुमच्यासाठी चांगला होतो, मग..; ओमराजे एबीपी माझावर भरभरुन बोलले

धाराशिव : गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) यांच्या विरोधात गेला. विशेष म्हणजे, या खटल्यातील सर्वच आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर, ओमराजेंनी न्यायालयाच्या (Court) निर्णयावर नाराजी व्यक्त करत आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले. त्यातच, गेल्या दोन दिवसांपासून ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेवरुन मोठा गोंधळ उडाला आहे. मात्र, अद्यापही त्यांची राजकीय भूमिका तळ्यात की मळ्यात अशीच आहे. कारण, एकीकडे दिल्लीत ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन झाल्याचं सांगितलं जात असून मी कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच माझा निर्णय घेईल, असे ओमराजे यांनी म्हटलं. त्यानंतर, प्रथमच त्यांनी एबीपी माझावर आपली भूमिका मांडली.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर आणि जयराजे निंबाळकर दोन्ही बंधू पहिल्यांदाच एबीपी माझावर आपली भूमिका मांडली. वडिलांची हत्या झाली त्याप्रमाणेच कालचा दिवस आमच्या कुटुंबासाठी होता, सगळे ओक्साबोक्सी रडत होते. यावेळी, हत्या प्रकरणाच्या निकालावर बोलताना ओमराजे निंबाळकर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. समद काझी यांचा मुलगा दीड वर्षाचा होता, त्याने आपल्या वडिलांचा चेहराही पाहिला नाही, असे त्यांनी म्हटलं. तर, राजकीय भूमिकेबाबत मात्र ओमराजे निंबाळकर यांनी मौन बाळगले.

सोशल मीडियावरुन ट्रोल केल्यावरही ओमराजे व्यतीत झाल्याचं दिसून आलं. वडिलांच्या हत्येसाठी मी गेलो असं काहीजण म्हटले, तसं असतं तर 2022 लाच गेलो असतो. त्यामुळे, ट्रॉलर्सने ट्रोल करताना विचार करायला हवा, तीन दिवसात मी एवढा वाईट झालो का? असा सवाल ओमराजेंनी विचारला. निवडणुकीत लोकसभा, विधानसभेला आम्हाला मतं पडली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेला आम्ही मशालच्या नावावर लढत होतो, सत्तेच्या पुढे आम्ही एकाही ठिकाणी निवडून आलो नाही, आम्ही एवढे वाईट होतो का? असा सवाल त्यांनी विचारला.

राजकीय प्रश्नावर मौन

दरम्यान, ओम बिर्ला यांची भेट घेतली का? वेगळा गट स्थापन करण्यासाठी स्वाक्षरी केली का? या सर्व प्रश्नावर ओमराजे निळबाळकर यांचे मौन पाहायला मिळालं, उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता का? एकनाथ शिंदे यांच्याशी काही बोलणं झालं का? कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांच्या भेटीत काय झालं? या सर्व राजकीय प्रश्नांवर ओमराजे निंबाळकर यांनी मौन बाळगलं आहे. तर, मी कार्यकर्त्यांशी वन टू वन संवाद साधणार आणि त्यानंतरच पुढील भूमिका जाहीर करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

ठाकरेंचा फुटलेला खासदार पहिल्यांदाच मीडियासमोर; नागेश पाटील आष्टीकरांनी सांगितलं शिवसेना सोडण्याचं राज’कारण’

Comments are closed.