ट्राय-सीरीजवर भारताचा कब्जा! फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर 66 धावांनी विजय

भारत ‘ए’ संघाने 66 धावांनी ट्राय-सीरीज जिंकली असून भारताच्या या विजयाचा हिरो ठरला तो वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi). इंडिया-ए आणि श्रीलंका-ए यांच्यात झालेला हा अंतिम सामना एकतर्फी राहिला. प्रथम फलंदाजी करताना इंडिया-ए संघाने 50 षटकांत 9 बाद 377 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंका-ए संघ 311 धावांपर्यंतच मजल मारू शकला. वैभव सूर्यवंशीने केवळ 29 चेंडूत 94 धावांची वादळी खेळी केली. तर गोलंदाजीमध्ये यश ठाकुर आणि विपरज निगम यांनी 3-3 विकेट्स घेतल्या.

भारतासाठी प्रियांश आर्य (Priyansh Aarya & Vaibhav Suryavanshi) आणि वैभव सूर्यवंशी यांनी 8.5 षटकांत 132 धावांची सलामी दिली. प्रियांश आर्यने 29 चेंडूत 39 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 6 चौकार आणि 1 षटकार झळकावले. वैभव सूर्यवंशीने 29 चेंडूत 94 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 8 षटकार मारले. ऋतुराज गायकवाडने 40 धावांचे योगदान दिले.

कर्णधार तिलक वर्मानेही (Tilak verma) अर्धशतक झळकावले. त्याने 90 चेंडूत 67 धावांची खेळी केली. ज्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार सामील होता. तर कुमार कुशाग्र 36, सूर्यांश शेड्गे 02, निशांत सिंधू 16 आणि विपरज निगम 27 धावा करून बाद झाले. अंकुल रॉयने शेवटी केवळ 15 चेंडूत 39 धावांची धमाकेदार खेळी केली. अशा प्रकारे भारत-ए ने 377 धावांची विशाल धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 47.1 षटकांत 311 धावांतच गारद झाला. निरोशन डिकवेला 25, अविष्का फर्नांडो 03, नुवांडू फर्नांडो 21, सदीरा समराविक्रमा 52, सहन अरचिंगे 38, रविंडू फर्नांडो 19, विजयाकांत व्यासकांत 39, मोहम्मद शिराज 21 आणि दुलज समुधिता 15 धावा करून बाद झाले. भारताने दिलेल्या डोंगरएवढ्या धावसंख्येसमोर श्रीलंकेचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही.

भारताकडून गोलंदाजी करताना यश ठाकुरने 7 षटकांत 45 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. अशोक शर्माने 9 षटकांत 75 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. विपरज निगमने 9.1 षटकांत 60 धावा देऊन 3 श्रीलंकेच्या खेळाडूंना बाद केले. तर अंकुल रॉयने 9 षटकांत 42 धावा देत 2 विकेट घेतल्या. तसेच तिलक वर्मालाही एक विकेट मिळाली.

Comments are closed.