‘या’ खासदारांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण त्यांनी विश्वासघात केला : अजित नवले

अजित नवले: राज्यातील सहा खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.  या सहाही खासदारांना लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संविधान रक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निवडणुकीत पाठिंबा दिला होता असे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या विरोधामध्ये प्रचार करून राज्यभरातील माकपचे कार्यकर्ते आणि जनसंघटनांनी महाविकास आघाडीच्या या खासदारांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते. मात्र आता हे खासदार, ज्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जनता, महाविकास आघाडीचे सामान्य कार्यकर्ते व डावे पक्ष प्राणपणाने लढले, त्याच भाजपला पाठिंबा देण्यासाठी शिंदे सेनेत जाऊन मिळाले आहेत. जनतेचा व निवडणुकीत या खासदारांना निवडून आणण्यासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता काम केलेल्या डाव्या पक्षांच्या आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांचा हा घोर विश्वासघात असल्याचे मत अजित नवलेंनी व्यक्त केले. त्यामुळं या
राजकीय गद्दारीच्या  विरोधात माकप राज्यभर तीव्र निदर्शने  करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभेला जनतेने भाजपच्या उमेदवारांना नाकारत मविआच्या उमेदवारांना विजयी केले होते

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ताधारी पक्षांनी फूट पाडली होती. जनतेमध्ये या फुटीच्या विरोधात व आमदारांनी केलेल्या पक्षांतराच्या विरोधात तीव्र असंतोष होता. कांदा व दुधाचे भाव पाडल्याने सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये तीव्र संतापाची भावना शेतकऱ्यांमध्ये होती. किसान सभा व शेतकऱ्यांच्या आंदोलनातून ती तीव्रपणाने व्यक्त झाली होती. याचा परिणाम म्हणून जनतेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना नाकारत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले होते असे नवले म्हणाले.

महाविकास आघाडीसारखे पक्ष डाव्या पक्षांना निवडणुकीत उमेदवार म्हणून न्याय देत नाहीत

यापूर्वी सुद्धा सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व नंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अशाच प्रकारे आमदारांनी पक्षांतर केले. ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतानाना, त्यांना निवडून आणण्यासाठी सुद्धा डाव्या पक्षांनी महाराष्ट्रभर आपले योगदान दिले होते. डावे पक्ष आणि त्यांच्या सर्व संघटना जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने जीवाचे रान करत संघर्ष करतात. साधन संपत्ती व पैसा उपलब्ध नसतानाही उपाशी तापाशी राहून संघटना बांधतात. महाविकास आघाडी सारखे पक्ष डाव्या पक्षांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत उमेदवार म्हणून न्याय देत नाहीत. तात्विक बांधिलकी नसलेल्या मात्र पैसा लावून निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या लोकांना उमेदवारी दिली जाते. प्रामाणिकपणाने तत्वनिष्ठेने काम करणाऱ्या डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना मात्र योग्य जागा देण्याचे टाळले जाते. असे असताना पैसा आणि यंत्रणा उभी करण्याची क्षमता पाहून उमेदवारी दिलेले आणि मग निवडून आलेले लोक महाविकास आघाडीच्या या तिन्ही पक्षांमध्ये टिकतात का? हा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित झाला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी याबाबत आत्मचिंतन करण्याची व योग्य त्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. धर्मनिरपेक्षता, लोकशाही, जनतेचे खरे खुरे हित, संविधान रक्षण यासारख्या नीतिमूल्यांची कोणतीही चाड नसलेल्या मात्र केवळ बक्कळ अवैध पैसा असलेल्या लोकांना आपण उमेदवारी दिल्यास काय परिणाम होतो याचा पुनर्विचार या पक्षांनी केला पाहिजे.

माकपने संधीसाधू पक्षांतराला विरोध करण्याचा निर्णय घेतला

आमदार खासदारांच्या गद्दारीच्या ह्या प्रवृत्तींना लगाम घालण्यासाठी जनतेत जाऊन जनमत तयार करण्याची आवश्यकता आहे. तसेच निवडणूक आयोग व सरकारी यंत्रणांचा गैरवापर रोखण्याची व अमुलाग्र निवडणूक सुधारणा लागू करण्याची देशात नितांत आवश्यकता आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यासाठी राज्यभर निदर्शने करण्याचा व अशा प्रकारच्या संधीसाधू पक्षांतराला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या सर्व शाखा जनतेला बरोबर घेऊन ही व्यापक मोहीम राबवणार आहेत. राज्यभर निदर्शने करून व गद्दारांचे पुतळे जाळून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा वारंवार होणाऱ्या गद्दारीला विरोध करण्याची भूमिका घेत आहे.

विचाराचे राजकारण संपुष्टात येत आहे

अशी सर्वच पक्षांतरे ही विकासाच्या नावाखाली होत असतात. जनतेच्या तिजोरीत जमा झालेला पैसा मतदार संघात विकास निधी म्हणून शस्त्रासारखा वापरला जात आहे. केवळ आपल्याच पक्षाच्या आमदार, खासदारांना किंवा आपल्याला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना आणि खासदारांना हा निधी पुरवला जातो. यातून जनतेमध्ये विकासाचा आभास निर्माण केला जातो. प्रत्यक्षात मात्र यातून मोठे कमिशन, टक्केवारी आणि गफले करून स्वतःची संपत्ती वाढवली जाते आणि पुढील निवडणुकीसाठी पैसा जमवला जातो. टक्केवारीच्या ह्या राजकारणात सहभागी होता यावे यासाठीच विरोधात निवडून आलेले आमदार, खासदार सत्ताधारी पक्षाबरोबर जाऊन मिळत आहेत. मात्र यामुळे विचाराचे राजकारण संपुष्टात येत असून लोकशाही व निवडणुकांवरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे. लोकशाहीसाठी हा मोठा धोका आहे.

राजकारणातील सर्व प्रकारच्या संधिसाधूपणाच्या विरोधामध्ये जनतेत जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. पक्षाने अशा प्रकारच्या व्यापक जनजागृतीचा निर्णय घेतला असून पक्षाच्या सर्व शाखा, पक्षाला मानणाऱ्या जन व वर्गीय संघटनांच्या सर्व सभासदांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे तसेच जनतेला या मोहिमेत मोठ्या संख्येने जोडून घेण्याचे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments are closed.