३१ बेकायदा गोदामांवर बुलडोझर, ठाणे पालिकेची दिव्यात कारवाई
महापालिका हद्दीतील दिव्यातील शिळ, डायघर परिसरातील बेकायदा इमारतींच्योपाठ अनधिकृत गोदामे उभी राहत आहेत. या बेकायदा गोदामांचा विषय ठाणे पालिकेच्या गुरुवारी झालेल्या महासभेत गाजल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर या भागातील तब्बल ३१ बेकायदा गोदामांवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली असून या कारवाईमुळे गोदाममाफियांचे धाबे दणाणले आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील बेकायदा गोदामांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत गोदामांचे सर्वेक्षण आणि ते गोदाम जमीनदोस्त करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत शिळफाटा येथील आवार गल्ली परिसरात असलेल्या ३१ अनधिकृत गोदामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढेही कठोर कारवाई
पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसेच स्क्रॅप साठवणूक करणारी गोदामे भूईसपाट करण्यात आली. शासकीय, आरक्षित तसेच सरकारी भूखंडांवर उभारण्यात आलेल्या बेकायदा गोदामांची तपासणी आणि सर्वेक्षण सुरू असून यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पालिकेने दिला.
Comments are closed.