वैभव सूर्यवंशीसाठी भावनिक क्षण! टीम इंडियाची जर्सी मिळताच केलं असं काही; VIDEO VIRAL

ज्युनियर क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर, वैभव सूर्यवंशी आता टीम इंडियासाठी पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. मंगळवारी तो भारतीय संघासोबत आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला. त्याआधी, बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक विशेष व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये वैभवला टीम इंडियाची अधिकृत किट मिळताना दिसत आहे.

किटचा बॉक्स उघडल्यावर वैभवने सर्वात आधी आपली टीम इंडियाची जर्सी पाहिली. ती पाहताच त्याला प्रचंड आनंद झाला. या व्हिडिओमधून वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणता जर्सी क्रमांक परिधान करणार हे देखील स्पष्ट झाले; तो टीम इंडियासाठी ३ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

व्हिडिओमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना वैभव म्हणाला, “हे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ज्या दिवसापासून मी पहिल्यांदा बॅट हातात घेतली, तेव्हापासून पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे. ही जर्सी पाहून मला खूप आनंद झाला. हे माझ्यासाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटत आहे. त्या क्षणी मला काय प्रतिक्रिया द्यावी हेच सुचत नव्हते.”

आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ मंगळवारी चेन्नईहून रवाना झाला. वैभव सूर्यवंशी या दौऱ्यावर संघासोबत गेला आहे. दरम्यान, वैभवचे वडील आधीच आयर्लंडला पोहोचले आहेत.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी वैभवच्या पालकांना आयर्लंडला जाण्याची परवानगी बीसीसीआयने दिली आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना २६ जून रोजी होणार आहे, तर दुसरा सामना २८ जून रोजी खेळवला जाईल.

दरम्यान, आयर्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी या मालिकेतून बाहेर पडला आहे. भारतीय संघासाठी हा दुहेरी धक्का मानला जात आहे, कारण हार्दिक पांड्या आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत, सूर्यंश शेडगेचा संघात समावेश केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

Comments are closed.