आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमधील टी 20 मालिकांसाठी मुंबईकरची संघात एंट्री, नितीश कुमार रेड्डीची रिप्लेसमेंट जाहीर
येत्या २६ जूनपासून भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी २० मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. या दोन्ही दौऱ्यातून स्टार अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. त्याच्याजागी कोण, याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निवेदन जाहीर केले आहे. रेड्डीच्या जागी मुंबईच्या २३ वर्षीय सूर्यांश शेडगेची निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच घरच्या मैदानावर पार पडलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर नितीशने डाव्या मांडीच्या स्नायूमध्ये अस्वस्थता जाणवत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीनंतर, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला पुनर्वसनाच्या कालावधीची शिफारस केली असून, त्यामुळे तो दोन्ही टी २० मालिकांमधून बाहेर पडला आहे.
श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या तिरंगी मालिकेत भारत ‘अ’ संघासाठी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर सूर्यांशला संघात स्थान मिळाले. मधल्या फळीत फलंदाजी करताना त्याने पाच सामन्यांमध्ये १४७ धावा केल्या होत्या. तसेच त्याने गोलंदाजीतही हात आजमावला. त्याने संपूर्ण स्पर्धेत २३ षटके गोलंदाजी करून योगदान दिले.
सूर्यांश २०२४-२५ मध्ये मुंबईच्या विजयी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मोहिमेतही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता. त्याने खालच्या मधल्या फळीत २५१.९२ च्या स्ट्राइक रेटने १३१ धावा केल्या होत्या.
Comments are closed.