यवतमाळमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी; उमरी आणि भोजूनगरातील दुर्दैवी घटना
यवतमाळमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. यात अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. राळेगाव तालुक्यातील उमरी शेतशिवार आणि उमरखेड तालुक्यातील भोजूनगर तांडा येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राळेगाव तालुक्यातील उमरी शेतशिवारात भीमराव रामभाऊ लाटकर (55), साहिल भीमराव लाटकर (22) आणि निखिल वाल्मिक भोयर (40) हे शेतात काम करत असताना अचानक मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. त्याचवेळी वीज कोसळून भीमराव लाटकर आणि निखिल भोयर यांचा जागीच मृत्यू झाला. तर साहिल लाटकर गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम राळेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातत हलविण्यात आले.
दुसरी घटना उमरखेड तालुक्यातील भोजूनगर तांडा शेतशिवारात घडली. महेश गणेश आडे (22) हा आपल्या वडिलांसह व अन्य ग्रामस्थांसोबत जनावरे चारण्यासाठी गेला होता. अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने सर्वांनी झाडाखाली आसरा घेतला. दरम्यान, जनावरे भरकटत असल्याने त्यांना हाकण्यासाठी महेश काही अंतरावर गेला असता त्याच्या अंगावर वीज कोसळली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर काळू कनीराम पवार (70) हे विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
उमरीतील दोन आणि भोजूनगरातील एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट वाढत असल्याने शेतकरी व शेतमजुरांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Comments are closed.