Ratnagiri News – खेड शहरात पावसाची दमदार हजेरी; पहिल्याच सरींनी नागरी सुविधांची पोलखोल
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खेड शहरासह तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी पहिल्याच पावसाने शहरातील नागरी सुविधांतील त्रुटी समोर आणल्या आहेत.
पावसाच्या जोरदार सरींमुळे शहरातील अनेक भागांतील गटारे तुडुंब भरून वाहू लागली. परिणामी सांडपाणी आणि कचरा रस्त्यावर आल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. विशेषतः खेड-दापोली मुख्य मार्गावर गटारातील पाणी रस्त्यावर साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
दरम्यान, शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांनाही या परिस्थितीचा फटका बसला. अनेक विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. त्यामुळे पालकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. पहिल्याच पावसात गटार व्यवस्था विस्कळीत झाल्याने नालेसफाई आणि गटार स्वच्छतेच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी झाली का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून गटारे आणि नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आगामी काळात मुसळधार पाऊस झाल्यास शहरातील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
Comments are closed.