विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर! पण त्यांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आलीय : रोहिणी खडसे

मुंबई: विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर, पण हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लगावला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा शोक प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. हा शोक प्रस्ताव वाचताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून अनेक चुका झाल्या. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर खरमरीत पत्र लिहित टीका केली. त्यानंतर मोठा वाद उभा झाला आहे. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील उडी घेतली आहे.

रोहिणी खडसेंनी नार्वेकरांचा व्हिडिओ केला पोस्ट

रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून नार्वेकर यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यावर त्या म्हणाल्या आहेत की, मनसे पक्षप्रमुख श्री. राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट वाचली आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचे कालचे आशा दिदींच्या शोक प्रस्तावाचे भाषण ऐकले. ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ असं का म्हटलं जातं यांचं जळजळीत वास्तवच अक्षरशः समोर आलं.  विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर,  पण श्री. नार्वेकरांचे भाषण ऐकून हेडमास्तरांना पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आलीये असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरेंनींही व्यक्त केला संताप

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? अशा शब्दात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) संतप्त भावना बोलून दाखवल्या.

आशाताईंच्या निधनाचा हा प्रस्ताव राहुल नार्वेकरांनी स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असतं, कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही.  बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत. भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपलाही टोला लगावला.

Comments are closed.