Nanded News – नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसेचा आसूड मोर्चा, ट्रॅक्टरच्या सहभागाने सबंध शहर दणाणले

राज्य सरकारने लाडक्या बहिणींना फसवलं, शेतकर्‍यांना फसवलं, विद्यार्थ्यांना फसवलं, सोंग घेवून झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हा आसूड मोर्चा असून, सरकारने आता तरी जागे व्हावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येथे केले.

नांदेड येथे शेतकरी, व्यापारी, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. या मोर्चात जिल्हाध्यक्ष तथा खासदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, शहर अध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार आदी सामील झाले होते.

मोर्चात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर चालक शेतकरी देखील सामील झाले होते. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल टिका केली. शेतकरी, व्यापारी, नागरिक, विद्यार्थी यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून, पेपरफुटीच्या प्रकरणामुळे १४ जणांनी आत्महत्या केल्या. तरीही सरकारला लाज वाटत नाही. नोकरदार, चंदेरी दुनिया व उद्योग क्षेत्रातील मंडळी आत्महत्या करत नाहीत, पण शेतकरी आत्महत्या करतो याला हे सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. सोंग घेवून झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हा आसूड मोर्चा आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना, शेतकर्‍यांना, विद्यार्थ्यांना व रोजगार मागणार्‍यांना फसवलं, इंधन शंभरी पार गेलं, इंधनाची टंचाई निर्माण झाली, सिलेंडरने हजार पार केले. पण शेती मालाला हमी भाव मिळत नाही, ५० खोके एकदम ओकेमुळे बँकेत व व्यवहारात नोटांचा तुटवडा आहे, सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशा सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष तथा खासदार रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सरकारचे दाखवायचे दात वेगळे व खाण्याचे वेगळे आहेत, गेंड्याची कातडी असलेल्या सरकारवर आता आसूड ओढण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, विठ्ठल पावडे, गफार खान, एकनाथ मोरे आदींची भाषणे झाली. यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हर्षवर्धन सपकाळ, खासदार रविंद्र चव्हाण, हणमंत पाटील, प्रा.यशपाल भिंगे, सुरेंद्र घोडजकर, डॉ.श्रावण रॅपनवाड, एकनाथराव मोरे, अब्दुल गफार अब्दुल सत्तार, बालाजी गाडे, गोविंदबाबा गौड, शांताताई पाटील, ज्योती कदम, राजू पाटील रावणगावकर, सुरज शिंदे, राजेश पावडे, सुरेश हाटकर, महेश देशमुख, सत्यपाल सावंत, भगवानराव मनूरकर  यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments are closed.