अलका याज्ञिक, मामूट्टी आणि अमृतराज यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
क्रिकेटपटू रोहित शर्माचा पद्मश्रीने गौरव : राष्ट्रपती भवनात पद्मपुरस्कारांचे वितरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कारांचे वितरण केले. या सोहळ्यात देशातील 65 व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. टी. थॉमस यांना जनसेवा तर मल्याळी पत्रकार पी. नारायणन यांना साहित्याच्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याचबरोबर गायिका अलका याग्निक, अभिनेता ममूटी, अमेरिकेत कार्यरत प्रख्यात ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दत्तात्रेयुडु नोरी, तसेच भारतीय टेनिसपटू विजय अमृतराज यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 2 पद्मविभूषण, 7 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यापूर्वी एकूण 131 व्यक्तिमत्त्वांची पद्म पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात यातील काही जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आल होते.
नागालँडमधील गुरु संग्युसंग पोंगनेर यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. ते 6 दशकांपासून ‘आगो नागा’ लोककलेच्या जतनासाठी काम करत आहेत. पोंगनेर यांनी पारंपरिक पोशाख परिधान करत पुरस्कार स्वीकारला आहे.
भारतीय शास्त्राrय गायिका मंगला कपूर यांनाही पद्मश्रीने गौरविण्यात आले. ग्वाल्हेर घराण्याशी संबंधित मंगला कपूर यांनी भारतीय शास्त्राrय संगीतात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
सार्वजनिक सेवा क्षेत्रातील योगदानासाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना मरणोत्तर पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले. तर टेनिसपटू राहिलेले डॉ. विजय अमृतराज यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आशियाई टेनिसला नवी उंची गाठून देणाऱ्या विजय यांनी 16 एटीपी पुरस्कार जिंकले होते. 14 वर्षांमध्ये ते आशियाई टेनिसमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिले होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी व्लादिमीर मेस्तविरीश्विली (मरणोत्तर) पद्मश्रीने गौरविले आहे. व्लादिमीर हे ग्लोबल रेसलिंगचे दिग्गज प्रशिक्षक होते. भारतीय रेसलिंग टीमचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि बजरंग पुनिया यासारख्या ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंना मार्गदर्शन केले आणि भारताला कुस्तीच्या क्षेत्रात जागतिक शक्तिस्थान ठरविण्यास भूमिका बजावली होती.
हॉकीपटूला पद्मश्री पुरस्कार
हॉकीपटू सविता पूनिया हिला पद्मश्रीने गौरविण्यात आले आहे. सविता यांना भारतीय महिला हॉकीच्या ‘द ग्रेट वॉल’ नावाने ओळखले जाते. सलग तीनवेळा ती एफआयएच गोलकीपर ऑफ द ईयर ठरली होती. अनेक महिला क्रीडापटूंसाठी ती प्रेरणेचा स्रोत ठरली आहे.
आर. माधवनचा सन्मान
प्रख्यात अभिनेता माधवन रंगनाथन याला भारतीय चित्रपटसृष्टी आणि कलाक्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. अभिनेता सतीश शाह यांना कलाक्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे भाऊ अरविंद शाह यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला आहे. चार दशकांच्या कारकीर्दीत स्वत:ची बहुमुखी प्रतिभा आणि कॉमिक टायमिंगसाठी प्रसिदद्ध सतीश शाह यांनी अनेक चित्रपट आणि स्मरणीय मालिकांमध्ये काम केले होते.
रशियन प्राध्यापिकेचा गौरव
इंडोलॉजीच्या प्रसिद्ध प्राध्यापिका आणि भाषातज्ञ डॉ. ल्यूडमिला खोखलोवा यांना राष्ट्रपती मुर्मू यांनी पद्मश्रीने सन्मानित केले आहे. ल्यूडमिला यांनी रशिया, इंग्रजी आणि हिंदीत 6 पुस्तके आणि 92 संशोधनपत्रे लिहिली आहेत. तसेच ऐतिहासिक भाषाशास्त्रावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले असून यात शीख धर्माची उत्पत्ती आणि विकासावर करण्यात आलेले अध्ययनही सामील आहे.
Comments are closed.